तळपते ऊन आणि त्यामुळे होणारी शरीराची लाहीलाही हे चित्र सध्या सगळीकडे पहायला मिळते. या उन्हापासून आपला बचाव करायचा असेल तर कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबाबतही सर्वच स्तरांवर चर्चा सुरु असल्याचे दिसते. उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी काय करावे इथपासून ते शारीरिक समस्या उद्भवू नयेत म्हणून काय करायला हवे अशा एक ना अनेक गोष्टींबाबत चर्चा होताना दिसते. हाच उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी आता प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस हीनेही आपल्या चाहत्यांसाठी काही खास टीप्स दिल्या आहेत. तिने दिलेले आहारातील हे बदल तुम्हाला कूल ठेवण्यास नक्कीच उपयुक्त ठरतील.

पाणी – उन्हाळ्यात पुरुसे पाणी पिणे आवश्यक असते. मी दररोज किमान ३.५ लिटर पाणी पिते. त्यामुळे माझे शरीर हायड्रेट राहते. तसेच त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते. याबरोबरच माझ्या यादीत असणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहाळं पाणी. शहाळं पाण्यामुळे माझ्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स भरुन निघण्यास मदत होते. त्यामुळे मला हलके तर वाटतेच पण तरी पोट भरलेले राहते.

हिरव्या रंगाच्या ५० शेडस – मी पछाडल्यासारखी सॅलेड खाऊ शकते. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त सॅलेड खाणे आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे तुम्हाला माझ्या लंचबॉक्समध्ये कायम पालेभाज्या आणि इतर सॅलेड मिळेल. इतरवेळीही दोन गोष्टींच्या मधल्या वेळात मी हे कुरकुरीत सॅलेड खात असते. मला मुळा, डाळिंब, सफरचंद आणि काकडी या सॅलेडमध्ये घातलेली जास्त आवडते. मुळा आणि काकडीमुळे तुमचे शरीर दिर्घकाळासाठी हायड्रेट राहते.

लिंबू सरबत – भर उन्हाळ्यात दुपारी घरी आल्यावर गार लिंबू सरबत घेतल्यामुळे मी दिवसभरासाठी ताजीतवानी राहते. या सरबताबरोबर कोरफड आणि मिंट हे मी शोधलेले एक नवीन कॉम्बिनेशन आहे.

कलिंगड – कलिंगडामुळे कायमच मला माझे बालपण आठवते. लहानपणी मी आणि माझी भावंडे मिळून एकत्र बसून खूप जास्त कलिंगड खायचो. पण घरात कलिंगड खाणे शक्य नसेल तर मी मिंट घालून त्याची स्मूदी सोबत नेते.

सब्जा – उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यात भिजत घातलेला सब्जा दिवसभरात एकदा तरी घ्यावा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तसेच यामध्ये असणाऱ्या फायबर्सचा शरीराला चांगला उपयोग होतो. वाटीभर आंबा आणि मिंटमध्ये हा सब्जा एकत्र केल्यास एक नवीन डेझर्ट तयार होते.