बहुचर्चित Jawa मोटरसायकलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सेवा सुरू केली आहे. ग्राहकांच्या शानदार प्रतिसादामुळे या गाडीची मागणी प्रचंड वाढलीये परिणामी गाडीसाठी वेटिंग पिरेड तब्बल 8 ते 10 महिन्यांवर पोहोचला आहे. इतका जास्त वेटिंग पिरेड असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने Delivery Estimator ही नवी सेवा सुरू केली आहे. याद्वारे ग्राहकाला बाइक नेमकी केव्हापर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचेल याबाबत माहिती मिळू शकते.

गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी नोंदणी केलेल्यांनाही आतापर्यंत बाइकची डिलीव्हरी मिळालेली नाही अशा अनेक तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. त्यानंतर कंपनीने Delivery Estimator सुरू करण्याचा निर्णय घेतला. 28 डिसेंबर 2018 पूर्वी Jawa बाइकसाठी नोंदणी केलेल्यांनाच या फीचरचा लाभ घेता येणार आहे. यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर बुकिंग आयडी आणि फोन क्रमांक टाकल्यास बाइकच्या डिलिव्हरीबाबत माहिती मिळेल. 28 डिसेंबरनंतर बुकिंग केलेल्यांना या सेवेचा लाभ मिळणार नाही. कंपनीकडून Delivery Estimator ही सेवा दुसऱ्यांदा सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर काही ग्राहकांनी Delivery Estimator चे फोटो शेअर केले असून वेटिंग पिरेड अजून वाढल्याचं म्हटलं आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिच्या क्लासिक लीजंड्स या कंपनीच्या पुढाकाराने जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल अखेर भारतीय रस्त्यांवर दाखल झाली आहे. कंपनीने लाँच केलेल्या तीन मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्समध्ये 293 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे, तर Jawa Perak मध्ये 334 सीसीच्या इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं ते 499 सीसीचं होतं.

क्लासिक लीजंड या महिंद्रांच्या मालकिच्या कंपनीनं झेक ब्रँडच्या भारतातल्या विक्रीसाठी आवश्यक ते परवाने घेतले आहेत. मध्यप्रदेशमधल्या पिथमपूर इथल्या कारखान्यात जावाचं उत्पादन केलं जात आहे. विशेष म्हणजे जावाची स्वतंत्र ओळख जपण्यात आली असून गाडीवर महिंद्राचा लोगो लावण्यात आलेला नाही. सध्या अशा प्रकारच्या हायएंड बाईक्सची मोठी चलती असून हार्ले, डुकातीसारख्या विदेशी कंपन्यांच्या मोटरसायकलनाही विशेष मागणी आहे. इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

किंमत –
दी जावा – 1.64 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा 42 – 1.55 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)
जावा पेराक – 1.89 लाख रु. (एक्स शोरुम दिल्ली)