रिलायंस जिओ येत्या काही आठवड्यांमध्ये एक नवा फीचर फोन लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीकडून त्यांचा लोकप्रिय फीचर फोन JioPhone 3 वर काम सुरू असल्याचं वृत्त आहे. 12 ऑगस्ट रोजी रिलायंस इंडस्ट्रिजची 42 वी सर्वसाधारण सभा आहे, त्यावेळी कंपनीकडून या फोनबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या ‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या आकडेवारीनंतर कंपनीने फीचर फोन लाँच करण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आकडेवारीत फीचर फोन बाजारात रिलायंस जिओचाच दबदबा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र गेल्या वर्षी 47 टक्केच्या तुलनेत यंदा त्यांचा हिस्सा केवळ 28 टक्क्यांवर आलाय.

नव्या फीचर फोनसाठी जिओ कंपनी मीडिया टेक (MediaTek)शी भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. जिओच्या 4G फीचर फोनवर काम सुरू आहे, लवकरच हे फोन उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. आम्ही KaiOS सोबत देखील काम करत आहोत अशी माहिती MediaTek च्या एका अधिकाऱ्याने इकोनॉमिक टाइम्सशी बोलताना दिलीये. MediaTekकिंवा जिओकडून या फोनबाबत किंवा या फोनच्या कोणत्याही फीचर्सबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

फीचर फोन बाजारात रिलायंस जिओचा दबदबा –

फीचर फोन सेगमेंटमध्ये रिलायंस जिओ 28 टक्के मार्केट शेअरसह अव्वल ठरली आहे. दुसऱ्या क्रमांकावर 21 हिस्सा असलेली सॅमसंग कंपनी आहे. त्या खालोखाल 12 टक्के, 10 टक्के आणि 9 टक्क्यांसह अनुक्रमे लावा, इंटेल आणि नोकियाचा क्रमांक लागतो.