केटोजेनिक आहारातून मेद व प्रथिनातून ९९ टक्के उष्मांक मिळत असतात त्यात अल्पकालीन पातळीवर काही आरोग्यविषयक फायदे दिसत असले तरी नंतर एक आठवडय़ाने त्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागतात असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
नेचर मेटॅबोलिझम या नियतकालिकात म्हटले आहे की, केटो आहार हा मर्यादित काळासाठी लाभ मिळवून देतो त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. ग्वानेथ पाल्ट्रो व किम करदाशियन यांच्यासह अनेक वलयांकित व्यक्ती हा केटो आहार घेतात त्यामुळे ही आहार पद्धती लोकप्रिय मानली जाते. यातील आहाराने शरीर मेद पटापट जाळू लागते. त्यामुळे काही प्रमाणात फायदा होतो असे अमेरिकेतील येल विद्यापीठाचे प्राध्यापक विश्वदीप दीक्षित यांनी म्हटले आहे.
जेव्हा शरीरातील ग्लुकोजची पातळी केटो आहारातील कर्बोदकांच्या कमी प्रमाणामुळे घटते तेव्हा शरीर उपासमारीच्या अवस्थेत जाते असे आपल्याला वाटते पण प्रत्यक्षात या काळात शरीर कर्बोदकांऐवजी मेद जाळण्यास सुरुवात करते. यातून शरीरासाठी पर्यायी इंधन असलेली केटोन रसायने तयार होतात. जेव्हा शरीर केटोन जाळू लागते तेव्हा शरीरात गॅमा डेल्टा टी पेशी विस्तारतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे शरीराची चयापचयाची क्रिया सुधारते.
केटो आहार एक आठवडाभर उंदरांना दिल्यास त्यांच्या रक्तातील साखर कमी होते व फायदा दिसतो. पण कालांतराने मेदाच्या ज्वलनाबरोबर त्याचा साठाही सुरू होतो. जेव्हा उंदीर जास्त मेद व कमी कर्बोदके असलेला आहार एक आठवडा उलटून गेल्यावरही घेतात तेव्हा ते जास्त मेद घेतात व कमी मेद जाळतात. त्यातून पुन्हा मधुमेहाचा धोका वाढतो. यात गॅमा डेल्टा टी पेशी या मेद पेशी कमी होतात.
(या बातमीत वापरलेले छायाचित्र सौजन्य Carnivore Style )
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 8:39 pm