तुम्ही १५ हजार रुपयांपर्यंत चांगला मोबाइल बघत असाल तर लेनोवोने ‘के सिक्स नोट’ हा मोबाइल बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे सध्या सगळ्याच मोबाइल कंपन्या आपले मोबाइल ऑनलाइन विकत असताना लेनोवोने मात्र हा मोबाइल ऑफलाइन म्हणजेच मोबाइल दुकानात उपलब्ध केला आहे.

या मोबाइलचे दोन प्रकार उपलब्ध आहेत थ्री जीबी – फोर जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी. फोनचं स्टोरेज तुम्ही मेमरी कार्डच्या साहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. हा मोबाइल अँड्रॉइड ६.०.१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. मोबाइलवर गेम खेळताना किंवा चित्रपट बघताना बऱ्याचदा अडथळा निर्माण होतो, पण या मोबाइलमध्ये कॉलकॉमचा ४३० ऑक्टाकोर सीपीयू आणि अड्रिनोचा ५०५ जीपीयू वापरला आहे ज्यामुळे रोजच्या वापरात व्हिडीओ बघणे, खेळ खेळणे, फोटो काढणे हे तुम्ही विनाअडथळा सहज वापरू शकता. व्हिडीओ बघणे अधिक रंजक होण्यासाठी यात ५.५ इंचांचा एचडी डिस्प्ले दिला आहे. हा मोबाइल फोर जी सपोर्ट करत असून यात तुम्ही दोन सिम कार्ड किंवा एक सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरू शकता. फोटो काढण्याची आवड असणाऱ्यांना लेनोवोने या मोबाइलच्या मागील बाजूस १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला असून पुढील बाजूस कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे, तसेच यात मागील बाजूस दोन फ्लॅश देण्यात आले आहेत ज्यामुळे तुमचे फोटो अधिक चांगल्या प्रकारे येतील. शिवाय यात वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, एफएम आहेच. तुम्ही तुमचा पेनड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता ज्यामुळे पेनड्राइव्हमधील गाणी, चित्रपट, फोटो किंवा फाइल मोबाइलमध्ये बघायचे असतील तर तुम्ही ते बघू शकता.

मोबाइलचा वापर सध्या खूप वाढला आहे आणि खूप कामं आपण आता मोबाइलवरून करू लागलो आहोत. अशा वेळी महत्त्वाचे काम करत असताना बॅटरी कमी झाल्यामुळे जर मोबाइल बंद पडला तर? या गोष्टीचा विचार करूनच लेनोवोने या फोनमध्ये चार हजार एमएएच इतकी बॅटरी दिली आहे, ज्यामुळे तुम्ही दिवसभर मोबाइल चार्जिग कमी न होता अगदी सहज वापरू शकता. फोनच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे ज्याचा उपयोग स्क्रीन अनलॉक करणे, महत्त्वाच्या फाइल्स सुरक्षित ठेवणे तसेच फोटो काढण्यासाठी करू शकता. मोबाइलमध्ये गाणी ऐकायला सगळ्यांनाच आवडतात, पण ती जर चांगल्या दर्जाची आणि अधिक सुस्पष्ट असतील तर ऐकायला अधिक मजा येते. यासाठीच लेनोवोने या मोबाइलमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस हे तंत्रज्ञान वापरले आहे ज्यामुळे तुम्ही अधिक सुस्पष्ट गाणी ऐकू शकता. हा मोबाइलला व्हीआरला साहाय्य करतो. म्हणजेच तुम्ही ३६० अंशाचे व्हिडीओ पाहू शकता (यात तुम्हाला व्हिडीओ बघताना त्यातील चित्रे आपल्या आजूबाजूलाच आहेत असा आभास निर्माण होतो) पण याकरिता तुम्हाला व्हीआर हेडसेट विकत घ्यावा लागेल.

लेनोवो के सिक्स नोटचे फायदे

मोबाइल दुकानात उपलब्ध असल्याने तुम्ही आधी मोबाइल बघून नंतर विकत घेऊ  शकता.

५.५ इंच चा एचडी डिस्प्ले असल्यामुळे चित्रपट, फोटो, खेळ अधिक चांगल्या प्रकारे बघू शकता.

चार हजार एमएएचची बॅटरी देण्यात आल्यामुळे मोबाइल अधिक वेळ वापरता येईल.

मोबाइलमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस हे तंत्र वापरले आहे, ज्यामुळे गाणी अधिक सुस्पष्ट ऐकू शकता.

फिंगरप्रिंट स्कॅनर वेगवान आणि दर्जेदार देण्यात आला आहे.

लेनोवो के सिक्स नोटचे तोटे

१५ हजार रुपयात तुम्हाला या मोबाइलपेक्षा अजून अधिक चांगले पर्याय उपलब्ध.

दोन सिम कार्ड वापरणार असाल तर मेमरी कार्ड वापरू शकणार नाही.

अँड्रॉइडची सातवी आवृत्ती आली असताना या मोबाइलमध्ये जुनी आवृत्ती ६.०.१ देण्यात आली आहे.

बॅटरी मोबाइलमध्ये बंद असल्यामुळे ती वापरकर्ता स्वत: काढू किंवा बदलू शकत नाही त्यासाठी त्याला लेनोवोच्या सेवा केंद्रांमध्ये जावे लागेल.

मोबाइल किंमत :
थ्री जीबी रॅम रु. १३९९९/- आणि  फोर जीबी रॅम रु. १५५००/-.

निखिल जोशी – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य लोकप्रभा