सततच्या धावपळीमुळे किंवा श्रमाची कामं केल्यामुळे अंगदुखी, पाठदुखी किंवा पायदुखी अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा लहान मुलांमध्ये देखील पाय दुखण्याच्या तक्रारी पाहायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच वेळा घरगुती उपाय किंवा डॉक्टरांची ट्रिटमेंट घेतल्यानंतरही या दुखण्यात फारसा फरक पडत नाही. मात्र, अशा वेळी आपल्या जीवनशैलीत किंवा रोजच्या आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. पायांची हाडे मजबूत होण्यासाठी आहारात आवश्यक त्या घटनांचा समावेश करणं किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळेच पायांचं दुखणं कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

१. दूध पिणे –

डॉक्टर किंवा स्त्रिया बऱ्याच वेळा आपल्या लहान मुलांना दूध पिण्यास सांगतात. मात्र, लहान मुलं कंटाळा करतात व दूध पिण्याचं टाळतात. परंतु, दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. दूधात ड जीवनसत्व असतं. यामुळे हाडे मजबूत होतात. म्हणूनच निदान दिवसातून १ वेळ ती एक कपभर दूध जरूर प्यावे.

२. व्यायाम किंवा मैदानी खेळ –

दररोज व्यायाम केल्यास हाडांचा कणखरपणा वाढतो. त्यामुळे मैदानी खेळ खेळणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. जर दररोज व्यायाम किंवा खेळ शक्य होत नसतील तर आठवड्यातून दोन दिवस वेळ काढून बॅडमिंटन, टेनिससारखे खेळ खेळावेत. तसंच योग, सूर्यनमस्कार देखील करावेत.

३. वजन कमी करा- आपले पूर्ण वजन आपल्या पायांवर पेलले जाते. त्यामुळे वजन वाढले की गुडघे, घोटे आणि टाचा दुखू लागतात.

४.धूम्रपान सोडा- तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे पायांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे थोडे जरी चालले तरी पाय आणि पोटऱ्या कमालीच्या दुखतात.

५. आहार- शाकाहारामध्ये सीताफळ, दूध, दही, पनीर; तर मांसाहारात ट्युना आणि सामन मासे, मटण, अंड्यातील पिवळा बलक, कॉडलिव्हर ऑईल यातून कॅलशियम आणि ड जीवनसत्व मिळते. आपल्या आहारपद्धतीप्रमाणे यांचा भरपूर वापर करावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)