30 October 2020

News Flash

हृदय निरोगी ठेवायचंय? मग ‘ही’ योगासने कराच

काही ठराविक योगासने केली तर हृदयाच्या ठोक्यांची गती नियमित होते

आपल्याला शरीर आणि मनाचं संतुलन हवं असेल तर व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यातही मनाच्या संतुलनासाठी योगसाधना केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या हृदयावर होतो. जर निरोगी हृदय हवं असेल तर दररोज योग हा केलाच पाहिजे. योग करण्याचे अनेक फायदे आहेत. यातला महत्त्वाचा फायदा म्हणजे योग केल्यामुळे हृदयविकारासारख्या समस्यांना आपण दूर ठेवू शकतो. ‘द योग इन्स्टिट्युट’च्या संचालिका डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी असेच काही सहजसोपी योगासने सांगितली आहेत.

हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणं असतात. परंतु मानसिक ताण हे महत्त्वाचं कारण आहे. मात्र हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी योग ती योगासने केली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. काही ठराविक योगासने केली तर हृदयाच्या ठोक्यांची गती नियमित होते, तसंच रक्तदाबही सुरळीत होतो.

१. योगेंद्र निष्पंद भव –
या आसनामध्ये दोन्ही पाय पुढे करून पायांच्या तळव्यांत २-३ फुटांचे अंतर ठेवा. त्यानंतर तुमच्या हातांचे तळवे वरच्या दिशेला करून मांड्यांवर ठेवा आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीत करा. हे आसन दररोज १५ मिनीटे केल्यावर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल.

२. द्रधासन –
मेंदूला आराम देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हे सर्वांत सहज आणि सर्वोत्तम आसन आहे. हे आसन करण्यासाठी जमिनीवर झोपा. त्यानंतर आधार घेऊन डाव्या कुशीवर वळा. डोक्यापासून पायांपर्यंत तुमचे शरीर संपूर्णपणे कुशीवर एका रेषेत आहे ना याची खात्री करून घ्या. त्यानंतर उजवा हात तुमच्या शरीरावर ठेवा आणि ५ मिनीटे याच स्थितीमध्ये डोळे बंद करुन शांत पडून राहा.

३. अनुलोम-विलोम प्राणायाम –
कोलेस्ट्रॉलचे शरीरातील अति प्रमाण, हृदयविकाराबरोबर मधुमेहावर मात करण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग होतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा. उजवी नाकपुडी उघडून श्वास बाहेर सोडून द्या. नंतर त्याच पद्धतीने उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन तो डाव्या नाकपुडीतून बाहेर सोडून द्या. अशाप्रकारे अनुलोम-विलोम प्राणायामाचे एक चक्र पूर्ण झाले. तुम्ही हा प्राणायाम १० मिनिटांसाठी करू शकता.

४.ताडासन –
या आसनात वरच्या दिशेने शरीर ताणले जात असल्यामुळे हृदय आणि पाठीच्या मणक्याला बळकटी मिळते. यामध्ये फुफ्फुसं फुलत असल्यामुळे दीर्घ श्वसनालाही याचा उपयोग होतो. हे आसन करण्यासाठी ताठ उभे रहा. पाय जुळवून घ्या आणि हात शरीराच्या बाजूला खाली ठेवा. हळूहळू श्वास घेत-घेत हात डोक्याच्या वर नेत संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणा. हळूहळू तुमच्या चौड्यांवर उभे रहा. वरच्या दिशेने तुमचे शरीर ताणा आणि सामान्य श्वासोच्छवास करा. ५-६ वेळा श्वासोच्छवास केल्यानंतर हळूहळू आसनातून बाहेर या.

दरम्यान, या योगासनांचा शेवट किंवा दिवसाचा शेवट ध्यान करुन करा. ध्यान केल्यामुळे मन एकाग्र होतं आणि प्रत्येक कामात मनं लागतं. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी आणि निरोगी हृदयासाठी योग करणं गरजेचं आहे हे एकंदरीत दिसून येतं.

(कोणतेही योगासन करण्यापूर्वी योगाभ्यासकांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच योगप्रकार करावा.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 4:14 pm

Web Title: lifestyle yoga asanas for heart ssj 93
Next Stories
1 coronavirus : हायपरटेन्शन बद्दलची मिथके अन् तथ्य
2 प्रीक्लेम्पसिया म्हणजे काय? गरोदर स्त्रियांनी घ्या ‘ही’ काळजी
3 लॉकडाउनमध्ये नोकरीची संधी, रेल्वेत निघाली ५६१ पदांची भरती
Just Now!
X