छोट्या व्हिडीओंच्या लाईव्ह स्ट्रीमिंगबाबत सगळ्याच सोशल मीडिया कंपन्या गंभीर झाल्या आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरनंतर आता लिंक्डइन (LinkedIn) या प्रोफेशनल सोशल नेटवर्कनेही आपल्या युजर्ससाठी लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा सादर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लिंक्डइन लाईव्ह स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर कंपनीने  LinkedIn Live हे फीचर लाँच केलं आहे.

मात्र, भारतीय ग्राहकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी अजून काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. कारण पहिल्या टप्प्यात ही सेवा फक्त अमेरिकन युजर्ससाठी लाँच करण्यात आली आहे. पण लवकरच हे फीचर भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. विशेषतः ज्यांना विविध व्यावसायिक मिटींग्स, सेमिनार, मेळावे किंवा पत्रकार परिषद लाइव्ह घ्यायची असेल अशांसाठी हे फीचर आणण्यात आलं आहे. हे प्रक्षेपण संपूर्ण लिंक्डइन कम्युनिटत नव्हे तर मर्यादीत युजर्सच्या ग्रुपमध्ये प्रक्षेपीत करता येणार आहे. एका अर्थाने हे प्रोफेशनल लाईव्ह स्ट्रीमिंग असेल.

लाइव्ह फीचरसाठी LinkedIn ने स्विचर स्टुडिओ, सोशल लाइव्ह आणि Wowza मीडिया सिस्टीम अशा कंपन्यांसोबत भागीदारीही केली आहे. Azure मीडिया सर्विसेस सारख्या कंपनीकडून LinkedIn लाइव्हसाठी तांत्रिक सपोर्ट मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात युजर्सला फक्त इनव्हाईट-ओन्ली या प्रकारातून ही सेवा वापरता येणार आहे. मात्र, लवकरच याला सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहितीदेखील देण्यात आली आहे. याबाबत बोलताना लिंक्डइनचे प्रोडक्ट मॅनेजर पीट डेव्हिस म्हणाले की,  ‘व्हिडीओंची सध्या सर्वाधिक मागणी आहे, लोकांच्या आग्रहाखातर हे फीचर लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला’. व्हिडीओसह जाहीरात दाखवण्याच्या प्रश्नावर अद्याप अशी योजना नसल्याचं डेव्हिस यांनी सांगितलं.