News Flash

करोनाचे दीर्घकालीन परिणाम

रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

डॉ. राहुल पंडित

करोना म्हणजेच ‘सार्स कोविड २’ या विषाणूने जगात प्रवेश करून आता एक वर्ष होत आहे. या विषाणूचे लक्ष्य झालेल्यांना या आजाराचे काही आठवडे, काही महिने, नव्हे तर पूर्ण वर्षभर दुष्परिणाम जाणवत आहेत. कोविडनंतरच्या या दुष्परिणामांच्या संकल्पनेला ‘लाँग कोविड’ असे म्हटले जात असून या संकल्पनेचे रुग्णांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

कोविड १९ महासाथीच्या काळात जगभरातच लोकांचे जीव वाचवण्यावर आणि आरोग्य सुधारणेवर भर दिला जात आहे. पण आता गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे दीर्घकालीन परिणाम जगाचे लक्ष वेधून घेत असून करोनामुक्त झालेल्या रुग्णांवरही या संसर्गाचे दीर्घकालीन दुष्परिणाम दिसून येत आहेत. काही ठरावीक रुग्णांनाच या लाँग कोविडची बाधा होत असल्याने या आजारातून पूर्णत: बरे होण्याच्या शक्यता अद्यापही स्वप्नवतच आहेत का, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुढे येत आहे.

लाँग कोविडची विशिष्ट व्याख्या सांगणारे पाठय़पुस्तक अस्तित्वात नसले तरीही कोविड होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांना लाँग कोविडची लागण झाल्याचे म्हटले जाते. यात केवळ दीर्घकाळ अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या रुग्णांचाच समावेश नसून ज्या रुग्णांना कोविडची अगदी सूक्ष्म लक्षणे दिसून आली आणि ज्यांना रुग्णालयात भरती होण्याची गरजही भासली नाही, अशा रुग्णांचाही यात समावेश आहे. थकवा येणे, कमी हालचालीनंतरही श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, स्नायूदुखी आणि सांधेदुखी, ऐकू कमी येणे, दृष्टीदोष, वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लाँग कोविडची सर्वसाधारण लक्षणे आहेत. लाँग कोविड झालेल्या अनेक रुग्णांना मानसिक स्वास्थ्यविषयक समस्याही उद्भवल्याचे दिसून आले आहेत. यात तणाव, चीडचीड यांपासून नैराश्यपर्यंतच्या लक्षणांचा समावेश आहे. ‘द जर्नल अमेरिकन मेडिकल असोसिएशन’तर्फे रोम, इटलीच्या फॉण्डाझिऑन पॉलिक्लिनिको युनिव्हर्सिटॅरिओ अगोस्टिनो जेमिल्ली आयआरसीसीएसने केलेला अभ्यास (१४३ रुग्णांचा अभ्यास) नुकताच प्रकाशित करण्यात आला. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आलेल्या कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांचा यात अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासांती असे दिसून आले की कोविड १९मधून बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी ८७.४ टक्के रुग्णांमध्ये बरे झाल्यानंतर जवळपास २ ते ३ महिन्यांपर्यंत आजाराची लक्षणे दिसत होती.करोना १०० टक्के बरी होतो का, असा प्रश्न अनेकजण विचारतात. पण या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देता येत नाही. करोनाचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी जगभर हा अभ्यास आयोजित केला असून करोनानंतर पूर्णत: बरे झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना पुन्हा काही लक्षणांना सामोरे जावे लागत आहे.

करोनामधून बऱ्या झालेल्या ज्या रुग्णांना लाँग कोविडची लक्षणे जाणवत असतील, त्यांच्यासाठी नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हिसतर्फे मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यांच्या ३-पी प्लानमध्ये पेस (गती), प्लान (नियोजन), प्रायोरटाइज (प्राधान्य) या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पेस (गती)- करोनातून बरे झाल्यानंतर किंवा रुग्णालयातून घरी आल्यावर लगेचच तुमच्या पूर्वीच्या रुटीनमध्ये रुळण्याची किंवा पूर्ववत आयुष्याची अपेक्षा करू नका. तुम्ही तुमच्या दैनंदिनीचे नियोजन करताना छोटय़ाशा विश्रांतीलाही महत्त्व द्या. दोन कामांमध्ये थोडा ब्रेक घ्या.

प्लान (नियोजन)- दैनंदिन कामांची यादी एकत्र पूर्ण करण्याऐवजी आठवडय़ाभरातल्या कामांचे विभाजन करा. तुमच्या रोजच्या वापरातील वस्तू तुमच्या जवळ राहतील किंवा सहज उपलब्ध असतील, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंच्या जागा बदलू शकता.

प्रायोरटाइज (प्राधान्य)- तुम्ही स्वत: जी कामे करू शकता आणि ज्या कामात तुम्हाला इतरांची मदत हवी असेल, त्या त्या कामांचे विभाजन करा. कामांच्या महत्त्वानुसार त्यांचे प्राधान्यक्रम ठरवा आणि घरातील कामे तुम्ही स्वत: करा आणि बाहेरची कामे कुटुंबातील अन्य व्यक्तींना करायला सांगा.

पुनर्वसन –  लाँग कोविड झालेल्या बहुतांश रुग्णांना विशेष काळजीची आवश्यकता असते. रुग्णांची पूर्ण क्षमता पुन्हा पूर्ववत होण्यासाठी त्यांना अनेकदा हृदयविकार किंवा श्वसनस्वास्थ्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते आणि सुधारणा होणे अत्यावश्यक असते. मानसिक आरोग्य सुधारणे आणि ते स्थिर राहणे हाही बरे होण्यातील महत्त्वाचा टप्पा असू शकतो.

एकूण सारांश असा की, डॉक्टरांनी रुग्णांच्या सतत संपर्कात राहणे आवश्यक असते. तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या काही तपासण्या, जीवनशैलीतील बदल किंवा औषधोपचार याविषयी तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ  शकतील. त्यामुळे डॉक्टरांची भेट घेणे अजिबात चुकवू नका, स्वास्थ्यपूर्ण खा, डॉक्टरी सल्ल्यानुसार औषधे घ्या आणि सकारात्मक विचार करा.

(लेखक फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:27 am

Web Title: long term consequences of coronavirus zws 70
Next Stories
1 सौंदर्यभान : इलेक्ट्रोक्वाट्री
2 तुपामुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग, हे फायदे नक्की वाचा
3 कापूराच्या वापरामुळे ‘या’ शारीरिक समस्या होतील दूर; जाणून घ्या फायदे
Just Now!
X