रविवारी , ५ जुलै रोजी वर्षातील तिसरं चंद्रग्रहण आहे. रविवारी गुरुपौर्णिमा आहे त्याच दिवशी चंद्रगहणाचा योग आला आहे. यंदा सहा ग्रहणं आहेत. दोन चंद्रग्रहणं (१० जानेवारी, ५ जून) आणि एक सूर्यग्रहण(२१ जून) झाले आहे. आगामी दोन चंद्रग्रहणे आणि एक सूर्य ग्रहण बाकी आहे. यामधील एक चंद्रग्रहण ५ जुलै रोजी लागणार आहे. हे उपछाया चंद्रग्रहण असून या ग्रहणात सूतककाळ नसेल. याचा अर्थ कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये वर्जित केली जाणार नाहीत. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म कुलाचार करावेत, असे सांगितले जात आहे.

कुठे दिसणार चंद्रग्रहण?
हा ग्रहणाचा कालावधी सुमारे २ तास २३ मिनिटांचा असेल. आशिया खंडाचा काही भाग, अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या देशात हे ग्रहण दिसेल. चंद्रग्रहणावेळी भारतात दिवस असल्यामुळे हे चंद्रग्रहण दिसणार नाही.

ग्रहणाची वेळ –
भारतीय वेळेनुसार, सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांपासून ते ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण लागेल.

छायाकल्प किंवा मांद्य चंद्रग्रहण –
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. या चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे