अतिरिक्त मद्यसेवनाचा मेंदूवर होणारा परिणाम नष्ट करणारे नवीन औषध शोधून काढण्यात आले आहे. या औषधाने अल्कोहोलचा मेंदूवर होणारा परिणाम दूर केला जाऊन मेंदू पुन्हा कार्यान्वित केला जातो. उंदरांमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगानुसार त्यांना १५ आठवडे सतत अल्कोहोल दिल्यानंतर त्यांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो तो दूर करण्यासाठी त्यांना नंतर टँडोस्पायरोन हे औषध दिल्यास त्यांच्या मेंदूची क्षमता पूर्ववत होऊन न्यूरॉन्स सुस्थितीत येतात. जादा अल्कोहोल सेवनाने मेंदूवर वाईट परिणाम होतात त्यावर टँडोस्पायरोन औषधाचा परिणाम प्रथमच तपासण्यात आला. टँडोस्पायरोन हे औषध सेरोटोनिन रिसेप्टरवर काम करते, असे ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. उंदरांना हे औषध दिल्यानंतर त्यांच्यातील अल्कोहोल कमी करण्याच्या काळातील नैराश्य कमी होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या प्रा. सेलेना बार्टलेट यांनी सांगितले की, टँडोस्पायरोन औषधामुळे मेंदूत न्यूरोजेनेसिसची प्रक्रिया सुधारते, शिवाय अल्कोहोलमुळे झालेला परिणाम दूर होतो. अल्कोहोलचा अति व गैरवापर केल्याने जे दुष्परिणाम होतात त्यावर औषधयोजना करण्यासाठी वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे स्मृती व अध्ययन क्षमतेवर झालेला परिणाम दूर होतो. हे औषध सध्या केवळ चीन व जपानमध्ये उपलब्ध आहे. सध्या ते तेथे नैराश्यावरील उपचारांसाठी वापरले जाते. त्यामुळे जादा अल्कोहोल सेवनाचा मेंदूवर जो परिणाम होतो तो दूर होण्यास मदत होते, असे बार्टलेट यांनी म्हटले आहे.