पुरुषांच्या उंचीमध्ये गेल्या १०० वर्षांच्या काळात सरासरी चार इंचाने वाढ झालीये! युरोपमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही माहिती पुढे आलीये. युरोप खंडातील पुरुषांच्या सरासरी उंचीमध्ये गेल्या १०० वर्षांत ११ सेंटिमीटरने वाढ झाल्याचेही अभ्यासात दिसून आले. १८७० ते १९८० या काळातील पुरुषांच्या उंचीमध्ये काय फरक पडला, याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला.
विज्ञानातील प्रगतीनंतर बालमृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. त्याचबरोबर गंभीर आजारांवरही उपचार करणे शक्य झाले. याच कारणांमुळे पुरुषांच्या उंचीमध्ये वाढ झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. २० शतकात झालेल्या दोन महायुद्धाच्या काळात पुरुषांच्या सरासरी उंचीमध्ये वाढ होण्याचा वेग वाढल्याचेही संशोधकांना आढळले.
एसेक्स विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक टिमोथी हॅटन यांनी गेल्या १०० वर्षांतील पुरुषांच्या सरासरी वयाचा अभ्यास केला. युरोपमधील १५ देशांतील वयवर्षे २१ असलेल्या पुरुषांची उंचीचा अभ्यास करण्यात आले. त्यासाठी १८७० ते १९८० या कालावधीचा विचार करण्यात आला. बालमृत्यूचे प्रमाण १८७१ ते ७५ या कालावधीत प्रति दहा हजार लोकांमागे १७८ इतके होते. ते १९७६ ते ८० या कालावधीत प्रति दहा हजार लोकांमागे १४ पर्यंत खाली आल्याचेही संशोधनात आढळले.