मुंबईत तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद सुरू; साडेतीनशेहून अधिक तज्ज्ञांचा सहभाग

भारतात कर्करोगाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढीस लागले असून त्यावरील उपचारांच्या खर्चाचे आकडे सामान्य रूग्णांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. यावर उपाय म्हणून परवडणारे व परिणामकारक उपचार व्हावेत यासाठी जगभरात संशोधन सुरू असून यातूनच ‘मेट्रोनॉमिक्स केमोथेरपी’या उपचार पद्धतीचा जन्म झाला आहे. या उपचार पद्धतीमुळे कर्करोग आटोक्यात येत असून त्यावरील खर्चही कमी होत आहे. पुढे संशोधन झाल्यास कर्करोग निर्मूलनात ही उपचारपद्धती मैलाचा दगड ठरेल असा दावा काही कर्करोग तज्ञांनी मुंबईत सुरू झालेल्या ‘मेट्रोनॉमिक्स अ‍ॅट मुंबई’ या ‘५ व्या आंतरराष्ट्रीय मेट्रोनॉमिक्स अ‍ॅण्ड अँजीओजेनिक परिषदे’त केला.

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ‘मेट्रोनॉमिक्स अ‍ॅट मुंबई’ ही आंतरराष्ट्रीय परिषद शुक्रवारपासून सुरु झाली. ती ८ मे पर्यंत चालणार आहे. भारत, फ्रान्स, इटली, कॅनडा येथून जवळपास ३५० हून अधिक डॉक्टर व तज्ज्ञ यात सहभागी झाले आहेत. या वेळी परिषदेसाठी खास कॅनडा येथून उपस्थित असलेले आणि या उपचार पद्धतीचे ‘पितामह’ म्हणून मान्यता पावलेले डॉ. रॉबर्ट कर्बेल म्हणाले की, सध्या कर्करोगावरील औषधांचा वाढता खर्च संपूर्ण जगासाठीच चिंताजनक बाब झाली आहे. या पाश्र्वभूमीवर ‘मेट्रोनॉमिक्स केमोथेरपी’ हा कर्करोगावरील उपचारासाठी किफायतशीर मार्ग सिद्ध होऊ शकतो. सध्या संशोधनात्मक पातळीवरच असलेल्या या उपचारपद्धतीद्वारे प्रायोगिक पातळीवर जगभरातील काही कर्करोग रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असून स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग आणि मान व डोक्याशी निगडीत कर्करोगांवर परिणामकारक उपचार झाले आहेत. परंतु, या उपचार पद्धतीच्या प्रायोगिक चाचण्या घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर खर्च होत असल्याने यासाठी सामाजिक संस्था व सरकारांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मेट्रोनॉमिक्स केमोथेरपी म्हणजे काय?

कर्करोगावर उपचार करताना सध्या जास्त मात्रेत ‘केमोथेरपी’ रूग्णांवर केली जाते. या केमोथेरपीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात व त्याचा खर्चही जास्त असतो. ही केमोथेरपीची रूग्णांना अत्यल्प प्रमाणात देऊन त्याचबरोबरीने मेट्रोनॉमिक्स केमोथेरपीच्या गोळ्या ठराविक अंतराने देण्यात येतात. या गोळ्यांमुळे कर्करोगाच्या पेशीची वाढ खुंटते तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढते. नियमित ही औषधे घेतल्याने कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला वारंवार अटकाव होऊन रोग आटोक्यात राहू शकतो. या काळात मूळ केमोथेरपी ही कमी मात्रेने चालूच ठेवणे आवश्यक असते. कमी मात्रेने केमोथेरपी सुरू असल्याने त्याचे मानवी शरीरावर दुष्परिणामही  कमी होतात, अशी माहिती टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर एस. डी. बनावली यांनी दिली.