भारतातले तब्बल ९० टक्के मोबाइल इंटरनेट वापरणारे मोबाइलधारक मोबाइल इंटरनेटचा वापर मातृभाषेतून करतात. सर्वसाधारण इंग्रजी अवगत असतानाही इंटरनेट वापरताना, त्यातही ऑनलाइन खरेदीसाठी अधिकांश ग्राहक आपली मातृभाषाच वापरत असल्याचे फ्लिपकार्टने केलेल्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. भारतीय ग्राहकांनी गेल्या काही वर्षांत ऑनलाइन खरेदीला प्रचंड प्रमाणात प्राधान्य दिले असले तरी, इंग्रजी भाषेतले इंटरनेटसंबंधीचे सांकेतिक शब्द अजूनही त्यांना तितके आपलेसे वाटत नाहीत.

Signup, Sign in, Sort, Filter, My cart, Add to cart, Use my current location, Tap to Autofill, CVV, Certified buyer, Wishlist, Frequently bought together, In Transit, ROM, Top reviewer, Authentic, Expandable या आणि अशा डिजिटल भाषेतील शब्दप्रयोगांपेक्षा भारतातला ऑनलाइन ग्राहक मातृभाषेतूनच खरेदीला प्राधान्य देतो, हे फ्लिपकार्टने २०१९ मध्ये तब्बल सहा महिने केलेल्या पाहणीतून दिसते आहे.

या सर्वेक्षणासाठी देशभरातील २५ ते ३५ वर्षे वयोगटातील, स्वस्त स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि मासिक ८००० ते १२००० उत्पन्न असणाऱ्या ऑनलाइन ग्राहकांची फ्लिपकार्टने पाहणी केली. या ग्राहकांमध्ये पदवीधर अथवा विनापदवीधर व बोली इंग्रजीत फारसे प्रावीण्य नसलेल्या ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश होता. मेट्रो शहरे व यानंतरचा क्रमांक असलेली पुणे, बंगलोर व हैदराबादसारखी शहरे वगळली, तर यानंतरच्या जवळपास सर्वच शहरी व ग्रामीण भागांतील मोबाइलधारक इंटरनेटसाठी स्थानिक भाषेला अधिक पसंती देतात.

इ-कॉमर्सचा वापर हे ग्राहक कसा करतात, हे पाहण्यासाठी फ्लिपकार्टने अनेक प्रश्न विचारले. त्यातून असे दिसले की, इंग्रजी-हिंदी कीबोर्डला सर्वाधिक ग्राहकांची पसंती आहे. तसेच उत्पादनांचे परीक्षणही ग्राहकांना मातृभाषेत वाचायला अधिक आवडते. त्यातही प्रमाण भाषेपेक्षा सोप्या बोली भाषेला ७५ टक्के ग्राहकांची पसंती असते. उत्पादनांची सविस्तर माहितीही सोप्या व स्थानिक भाषेत मिळावी, अशी अपेक्षा बहुतेक ग्राहकांनी व्यक्त केली.

फ्लिपकार्टच्या अहवालातील निष्कर्ष : पहिली पसंती स्थानिक भाषेलाच. इंग्रजीचे वावडे नाही, पण मातृभाषेशी सलगी अधिक.