मागील काही दिवसांपासून सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका सामान्य नागरिकांनाही बसत असल्याने वारंवार समोर येत आहे. मध्यंतरी एका टेलिकॉम कंपनीचा डेटा चोरल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता सायबर हॅकर्सनी उबरच्या जगभरातील ५ कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा चोरल्याचे वृत्त आहे. याबाबत उबर कंपनीकडून अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चोरलेल्या डेटामुळे ग्राहकांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी कंपनीला बराच खर्च करावा लागला आहे.  कंपनीचा तब्बल एक वर्षाचा गुप्त डेटा चोरल्यानंतर तो नष्ट करण्यासाठी कंपनीला ६, ९२,५०० रुपये भरावे लागले आहेत.

उबरच्या दोन कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. या दोघांनीही कस्टमर केअरला वेळेवर याबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे हॅकर्सला कंपनीची माहिती चोरणे शक्य झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती कंपनीचे सीईओ दारा खोसरोवशही यांनी दिली. एका अज्ञाताने कंपनीकडून वापरण्यात येणारं क्लाउड सर्व्हर हॅक करुन मोठ्या प्रमाणात डेटा डाऊनलोड केला. यात यूजर्सची नावं, त्यांचे ई-मेल, मोबाईल नंबर आणि जळपास सहा लाख ड्रायव्हर्सची नावं आणि त्यांचे लायसन्स नंबर चोरण्यात आल्याचं आमच्या लक्षात आलं असेही त्यांनी सांगितले.

मात्र, अशाप्रकारे एखाद्या अप्लिकेशनवरुन हॅकर्स डेटा चोरत असतील तर ते सामान्य ग्राहकांच्या आणि कंपनीच्या दृष्टीनेही धोक्याचे आहे. यासाठी जास्तीत जास्त सायबर सुरक्षेच्यादृष्टीने संशोधन आणि काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकार गांभीर्याने घेत वेळीच योग्य ती पाऊले उचलत त्यावर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. अन्यथा यापुढे डिजिटल व्यवहार करणे जास्त कठीण होईल.