लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप TikTok ला भारतात बॅन केल्यापासून विविध शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्स लाँच होत आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा युट्यूब अशा बहुतांश प्लॅटफॉर्म्सनी एखादे शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप लाँच केले आहे किंवा तशाप्रकारचे नवीन फिचर आणले आहेत. आता नेटफ्लिक्सनेही असंच एक नवीन फिचर लाँच केलंय.

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने एक व्हर्टिकल व्हिडिओ फिचर लाँच केलं असून Fast Laughs असं या फिचरला नाव देण्यात आलंय. आयफोन युजर्ससाठी हे फिचर रोलआउट करण्यास कंपनीने सुरूवात केली आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे नेटफ्लिक्सने ही माहिती दिली. हे फिचर टिकटॉकशी मिळतंजुळतं आहे, पण त्यापेक्षा बरंच वेगळंही आहे. शिवाय या फिचरची संकल्पनाही वेगळी आहे.

Netflix युजर्स आता छोटे फनी व्हिडिओ इथे बघू शकतील. एकामागोमाग एक व्हिडिओ बघता यावेत यासाठी टिकटॉकप्रमाणे स्वाइपचा पर्याय यात आहे. Netflix कडे व्हिडिओ कंटेंटची मोठी लायब्ररी आहे, त्यातूनच इथे व्हिडिओ येतील. Fast Laughs फिचरसाठी कंपनी सध्या फनी व्हिडिओवरच लक्ष केंद्रीत करत आहे. Netflix च्या कॉमेडी सीरिज आणि शोमधील काही क्लिप्स युजर्सना दिसतील. केवळ Netflix ओरिजनलचं कंटेंट नव्हे तर पूर्ण लायब्ररीमधील व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध होतील असंही समजतंय.

Fast Laughs फिचरद्वारे शॉर्ट व्हिडिओ क्लिप्स इतरांसोबत शेअरही करता येतात. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट आणि ट्विटरवरही शॉर्ट व्हिडिओ शेअर करता येतील. शिवाय Fast Laugh फिचरमध्ये पॅरेंट कंट्रोलचा पर्यायही आहे. याद्वारे कमी वयाच्या मुलांना चुकीचे व्हिडिओ दिसू नयेत याची पालकांना काळजी घेता येईल. सध्या हे फिचर काही देशांमध्येच जारी झालं आहे. अद्याप भारतात हे फिचर लाँच झालेलं नाही, पण भारत नेटफ्लिक्ससाठी मोठं मार्केट आहे त्यामुळे भारतातही हे फिचर लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. “सध्या निवडक देशांच्या आयफोन युजर्ससाठी हे फिचर उपलब्ध असून अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर टेस्टिंग सुरू आहे”, असं नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आलं आहे.