Moto Razr 2019 हा मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन अखेर आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून हा फोल्डेबल स्मार्टफोन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. आजपासून ऑफलाइन स्टोअर्समध्येही फोन उपलब्ध असेल असे कंपनीने म्हटले आहे. क्लॅमशेल डिझाइन असलेला हा फोन म्हणजे कंपनीच्या Moto Razr या एकेकाळी (2004 मध्ये) लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन मानलं जातंय. मोटोचा हा फोन भारतीय बाजारात सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड, Samsung Galaxy Z Flip आणि huawei mate x या स्मार्टफोन्सना टक्कर देईल, त्यामुळे या फोनची किंमतही तशीच लाखाच्या घरात आहे.

फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर Moto Razr 2019 च्या खरेदीवर काही ऑफर्सही आहेत. सीटीबँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 हजार रुपयांचे डिस्काउंट मिळेल. याशिवाय ग्राहकांना दरमहिन्याला 5,209 रुपये नो कॉस्ट इएमआयचा पर्यायही मिळेल. आतापर्यंत लाँच झालेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोल्डेबल फोन बराच वेगळा आहे. हा फोन व्हर्टिकली (उभा) फोल्ड होतो. यापूर्वी वर्षाच्या सुरूवातीलाच मोटोरोलाचे उपाध्यक्ष(ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन कॅरी यांनी सॅमसंग किंवा Huawei या कंपन्यांची स्टाइल कॉपी न करता स्वतःच्या वेगळ्या स्टाइलमध्ये नव्या प्रकारचा फोल्डेबल फोन लाँच केला जाईल असं सांगितलं होतं. जुन्या मोटो रेझरनुसार कंपनीने या फोनचं डिझाइन ठरवलंय. ‘मोटो रेझर’ 2019 मध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात. यातील एक स्क्रीन फोनच्या आतील बाजूला आणि दुसरी स्क्रीन बाहेरच्या बाजूला आहे. अनफोल्डेड कंडिशनमध्ये आतील स्क्रीनचं आकारमान 6.2 इंच असतं. यात फ्लेक्सिबल OLED इंटर्नल डिस्प्ले, 21:9 सिनेमाव्हिजन अॅस्पेक्ट रेशोसह आहे. तर , फोन फोल्ड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला 2.7 इंच स्क्रीन असते. हा बाहेरचा डिस्प्ले युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतील. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बाहेरच्या पॅनलवरच आहे.

फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे :-
फोटॉग्राफीसाठी या फोनमध्ये दोन कॅमेरे आहे. यामध्ये नाइट व्हिजन पर्यायासह 16 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा इंटर्नल कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पाय आउट-ऑफ-द-बॉक्सवर कार्यरत असेल, तसंच हा फोन ई-सिम कार्डलाही सपोर्ट करतो. हा फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेसह लाँच करण्यात आला असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर आहे.

किंमत :- फ्लिपकार्टवर हा फोन 1,24,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.