उपचारात्मक सूचनांचा समावेश असलेल्या संकेतस्थळामुळे आत्महत्येच्या विचारांवर मात करणे शक्य होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाला भेट दिलेल्या तीन हजार लोकांची त्यांनी मुलाखत घेतली.

या संकेतस्थळावर भेट देण्यापूर्वी तुम्हाला कसे वाटत होते आणि त्यावर काही मिनिटे घालवल्यानंतर कसे वाटत आहे, असा प्रश्न या लोकांना विचारण्यात आला. याबाबतचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्च’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार, या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर यापैकी एकतृतीयांश लोकांचा आत्महत्या करण्याचा विचार कमी झाला. त्यांच्या मनातील नकारात्मक भावनांची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.

याविषयी वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ उर्सुला व्हाइटसाइड यांनी सांगितले की, या निष्कर्षांमुळे आत्महत्येच्या विचारांवर मात करण्यासाठी झगडत असलेल्या लोकांच्या उपचारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हे संकेतस्थळ (nowmattersnow.org) वॉशिंग्टन विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक मार्शा लिन्हन यांनी विकसित केले आहे. या संकेतस्थळावर गेल्यास आपल्याला डायलेक्टिकल बिहॅव्हिअरल थेरपी (डीबीटी)ची माहिती मिळते. या उपचार पद्धतीमध्ये वर्तणूकविषयक विज्ञान आणि बौद्ध तत्त्वज्ञानातील सूत्रांचा (सावधपणा आणि स्वीकृती) मिलाफ घडवून मानसोपचार केले जात आहेत. या संकेतस्थळाला भेट दिलेल्या व्यक्तींचे ५ मार्च २०१५ ते ३ डिसेंबर २०१७ दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले.