बदाम, पिस्ते, शेंगदाणे, अक्रोड व डोंगरी बदाम यामुळे वजन कमी होतेच शिवाय लठ्ठपणाचा धोकाही टळतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.

आतापर्यंतच्या संशोधनातही शेंगदाणे व वरील सर्व घटक हे आरोग्यास फायदेशीर असल्याचे दिसून आले होते.

त्यामुळे वार्धक्याची प्रक्रिया मंदावते शिवाय स्मृतीही चांगली राहते. अमेरिकेतील लोमा लिंडा विद्यापीठातील संशोधकांनी १० युरोपीय देशातील २५ ते ७० वयोगटांतील तीन  लाख ७३ हजार जणांचा आहार व जीवनशैली यांची संग्रहित माहिती घेऊन त्याआधारे हे संशोधन केले आहे. त्यात असे दिसून आले की, वरील पदार्थ सेवन करीत नाहीत त्यांच्या तुलनेत ते सेवन करणाऱ्यांचे वजन कमी वाढलेले दिसून आले.

त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता पाच टक्क्यांनी कमी होते. लठ्ठपणाचीही जोखीम कमी होते. लोमा लिंडा विद्यापीठाच्या जोन सॅबेट यांनी सांगितले की, शेंगदाणे, बदाम, अक्रोड हे लठ्ठपणा वाढवत नाहीत. हे पदार्थ जास्त ऊर्जेचे, जास्त मेदाचे आहेत असा पारंपरिक समज आहे त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे त्यांनी ते खाऊ नये असेही सांगितले जात होते, पण ते अयोग्य आहे. युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.