मनपंखी
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

मला ‘म्हातारा’ व्हायला, म्हणवून घ्यायला खूप आवडतं. म्हाताऱ्या माणसाला कोकणात ‘बाबा’ म्हणतात. मी बाबा छत्री मुद्दाम घरी विसरून कॉलेजकडे अजून शिकवायला जातो आणि येताना वय विसरून भिजत भिजत घरी येतो!

काही लेमन यलो फुलपाखरं शिकवणीला लेकरं यावी तशी माझ्या आधीच आमच्या आवारात आलेली असतात. माझी ती वाट बघत बसतात. छे! बसत नाहीतच. ‘उडत उडत अभ्यास करतात. एटीकेटी लागली की, कळेल मग! ‘सर, दोनच मार्क कमी पडतायत्.. वाढवा ना, प्लीज’ म्हणू नका. उनाडक्या कमी करा!. फुलपाखरांना युनिफॉर्म ठाऊक नाही. दिला तरी ती घालणार नाहीत. डँबिस!

पाऊस ‘पडिक’ आहे. त्याला जॉब कुठे आहे? बीए पास क्लास! ऊन जरी सातरंगी टीशर्ट घालून आलं, तरी त्याची पोस्ट ऑनररी आहे. शेजारचं पिटुकलं ‘गोष्ट सांग ना’ म्हणत आलं, तरी मी त्याला ‘श्रावण बाळाची करुण कहाणी’ सांगत नाही. गेंडय़ाच्या जिममध्ये जाऊन सशाची बिल्ट कशी वाढली, आणि कोल्ह्य़ाला त्याने कसा ‘आवाज’ दिला ते सांगतो. हा वेलबिल्ट प्राणी म्हणजे ‘ससा’ आहे हे कोल्होबाला कळलंच नाय!.. पोरगं हसू लागतं. ‘हस रे माझ्या मुला’ असं मला मुद्दाम म्हणावं लागत नाही..

मला ‘पथ्यपाणी’ नाही आणि उपवास काय असतो तेही ठाऊक नाही. शिवाय, कोकणात घरगुती पदार्थ ‘मराठी जेवण’ उपाहारगृहात सहज मिळतात. त्यामुळेही मी जास्तच मुक्त, बिनधास्त झालो असेन. मर्जीला येईल ते करावं! करतोच!! तुरेवाला ‘क्रेस्टेड ककू’ जसा ऐटीत असतो, तसा मी ‘पाहुणा’ आहे. मूळ मुंबईकर असलेला माणूस कोकणात सेटल झाला तरी ‘पाहुणा’! तो ‘स्थानिक’ नव्हे!

रात्री वीज गेली, तरी काजवे लुकलुकतात. भिंतीवर पाली चुकचुकतात.  मला भयविस्मय कथा सुचते. अर्थात मी बाटलीतून कितीही भुतं काढून सोडली तरी भूतयोनी त्यामुळे ‘सिद्ध’ होत नाही. फक्त ‘प्रसिद्ध’ होते.

तुम्हाला सांगतो, जरा लवकर निवृत्त होऊनच तुमचं ते मोठ शहर सोडा. गावी येऊन राहा. हवं तर जुनी जागा बिल्डरला डेव्हलप करायला द्या आणि तिथे हक्काचा मोठ्ठा फ्लॅट विनामूल्य घ्या. ‘सोसायटी’ असली तरी ‘विहीर’ असतेच. एखादा पाहुणा विहिरीपाशी उघडय़ावर गार पाणी अंगावर घेत असेल तर कुणीही त्याला ‘शेमलेस’ वगैरे म्हणत नाही. (सध्या तरी फक्त पुरुषच तसं स्नान करतात.)

ढग दरवेळी ‘गडगडतात’ असं नाही. काही वेळा ते फक्त ‘गुरगुरतात.’ कधी हंबरतात. कधी कण्हतातसुद्धा. प्रदूषणामुळे ढगही गुदमरत असतील. बागेत बारकू काम करत असतो. हा पोरगा वेलबिल्ट असल्यामुळे बारकू हे नाव त्याला अजिबात शोभत नाही. बारक्या तसा हुशार!  एक उनाड बाई तिथे त्याच वेळी, मुद्दाम आली की, हा लगेच अंगावर शर्ट घालतो. पुरुषांचीही काही इज्जत असते.

पडतंय ते दव की, पाऊस असाही प्रश्न पडतो. एका विवाहित ‘बायसेक्शुअल’ माणसाला (नाव प्रसिद्ध आहे) स्त्री अधिक आवडते की पुरुष असाही प्रश्न पडला होता. काही प्रश्न गप्प बसवले जातात. ‘व्यवस्था’ ते चेपून, दाबून टाकते. दमन वाईट!

ऋतू मात्र रंगत, उधळत, निथळत पुढे जातो. अगदी छोटय़ा पाणथळ जागीही गप्पी मासे कुठून कसे येतात काय कळतच नाय! ते फुकट मिळतात म्हणून जी मंडळी तिथं येतात, त्यात मीही असतो हे कुणाला सांगितलंत तरी चालेल!

पूर्वी झुल्यावर मुली झुलायच्या. आता तसं काय राहिलं नाही. कोणपण बसतं. ‘सूर्यचूल’ पावसात रजा मागते. मी लगेच सँक्शन करतो. मग कुकर डय़ुटीवर येतो. शिट्टी वाजवू लागला की, मी त्याला ‘मवाली’ म्हणतो. मला ‘कायपण’ म्हणणारी शेजारीण हसते. चालायचंच!
सौजन्य – लोकप्रभा