प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपण यशस्वी व्हावं असं वाटत असतं. आता यश मिळवणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. यासाठी ज्ञानाबरोबरच कठोर मेहनत आणि जिद्द असणे गरजेचे असते. आपल्या सवयींप्रमाणेच स्वभावातील अनेक गोष्टी यश मिळविण्यासाठी आवश्यक असतात. मात्र त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अपयश येते आणि पर्यायाने आपण खचतो. पण काही बदलांचा ठरवून अवलंब केल्यास तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात यश मिळवायचे असल्यास कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात…

दिर्घकाळचे ध्येय ठरवणे

कोणतीही गोष्ट साध्य करायची असल्यास ध्येय ठरवणे हे ओघानेच आले. पण ध्येय ठरवताना ते दिर्घकालिन ठरवले तर आपण त्या ध्येयापासून विचलित होण्याची शक्यता असते. मात्र कमी कालावधीसाठीचे ध्येय ठेवल्यास ते साध्य करणे सहज शक्य असते. त्यामुळे कधीही ध्येय निश्चित करताना दीर्घ कालावधीसाठी ध्येयनिश्चिती न करता कमी कालावधीसाठी करा.

वेळ वाया घालवणे

वेळ ही प्रत्येक व्यक्तीकडे असणारी एक महत्त्वपूर्ण संपत्ती आहे, ती वाया घालवू नका. वेळेला कमी न लेखता वेळीच त्याचे महत्त्व ओळखा आणि त्याप्रमाणे तुमच्या यशासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करा. हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करा.

कारणे देणे

या जगात असा एकही व्यक्त नाही ज्याच्याकडून चुका होत नाहीत. मात्र आपल्याला आपल्या चुका किंवा कमतरता कळल्यावर त्या मान्यही करायला हव्यात. त्यामुळे या गोष्टींसाठी कारणे देत बसू नका तर त्या मान्य करा. अनेकांना आपल्या चुकीच्या गोष्टींवर किंवा कमतरतांवर कायम कारणे द्यायची सवय असते पण तसे न करता त्या त्या गोष्टी ओळखून मान्य केल्यास तुमचा यशाचा मार्ग आणखी सुकर होतो हे नक्की.

दुसऱ्यांशी तुलना नको

आपण कामाच्या ठिकाणी, मित्रमैत्रीणींमध्ये, नातेवाईकांत, शेजाऱ्यांशी स्वत:शी तुलना करतो. मात्र अशाप्रकारे तुलना करणे धोक्याचे ठरु शकते. तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्यांशी तुलना करणे बंद करा. त्यामुळे यश नकळत तुमच्याकडे येईल.

दुसऱ्यांचा प्रभाव

आपल्यावर एखाद्या व्यक्तीचा किंवा घटनेचा प्रभाव असणे ठिक आहे. मात्र तो प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपण आपली स्वत:ची ओळख विसरतो आणि त्या व्यक्तीला डोळे झाकून फॉलो करतो. पण यश मिळवायचे असल्यास असे करणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे तुमच्यावर कोणाचा प्रभाव असला तरी तो विशिष्ट प्रमाणात असेल याची काळजी घ्या.