स्मार्टफोन जगतामध्ये मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा ‘वन प्लस सिक्स टी’ हा फोन अखेर वन प्लस कंपनीने लॉन्च केला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात हा फोन लॉन्च करण्यात आला. या फोनबद्दलची उत्सुक्ता आणि वेळोवेळी या फोनसंदर्भात वेगवेगळ्या वेबसाइट्सने व्यक्त केलेल्या स्पेसिफिशन्सच्या अंदाजांशी मिळते जुळते फिचर्सच या फोनमध्ये आहेत. नव्या फोनमध्ये देण्यात आलेली स्पेस आणि परवडणारी किंमत या दोन गोष्टी ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याच्या ठरणार आहेत. हा फोन सहा महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आलेल्या वन प्लस सिक्सच्या प्राइज रेंजमध्येच असेल. या फोनमध्ये अतिरिक्त स्क्रीन लॉकची सोय, कंपनीने दावा केल्याप्रमाणे सर्वात जलद फिंगप्रिंट सेन्सर्स, वॉटरड्रॉप नॉच असे वेगळे फिचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

वन प्लस सिक्स टी या फोनमधील बेसिक मॉडेलची किंमत अमेरिकेमध्ये ५४९ डॉलर (अंदाजे ४० हजार ३०० रुपये) असेल तर टॉप मॉडेलची किंमत ६२९ डॉलर (अंदाजे ४६ हजार रुपये) असणार आहे. सध्या हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि मीरर ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. कंपनी वर्षाअखेरीसपर्यंत या फोनचे स्पेशल एडिशन लॉन्च करण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच कंपनीने टी-मोबाइलशी पार्टनरशीप करुन वन प्लस फोन ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. अमेरिकन ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे टी मोबाइल जुन्या फोनच्या मोबदल्यात एक्सचेंज ऑफरमध्ये चक्क ३०० डॉलरपर्यंत घसघशीत सूट देणार आहे.

भारतामध्ये हा फोन आज नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या एका शानदार सोहळ्याच लॉन्च करण्यात येणार आहे. रात्री साडेआठ वाजता होणाऱ्या सोहळ्यामध्ये भारतामध्ये हा फोन किती रुपयांना उपलब्ध होईल याबद्दलची सविस्तर माहिती तसेच वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती देण्यात येईल.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वन प्लसच्या या नवीन फोनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फोनच्या ६.४ इंच स्क्रीनवर असलेला वॉटरड्रॉप स्टाइलचा नॉच. वन प्लसच्या युझर्सने दिलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. फोनला ६.४ इंचाची फूल एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरवर हा फोन काम करेल. फोनमध्ये ६ जीबी तसेच ८ जीबी रॅमचा आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी इंटरनल मेमरी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. या फोनचे बेसिक मॉडेल कंपनीच्या आधीच्या फोनप्रमाणे ६४ जीबी इंटरनल मेमरी ऐवजी थेट १२८ जीबी इंटरनल मेमरीपासून सुरु होईल.

वन प्लस सिक्स टीमध्ये तीन कॅमेरा असतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र फोनमध्ये केवळ दोनच कॅमेरा असतील असे कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये स्पष्ट केले आङे. रेअर कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स३७६के सेन्सर्स असणार असेल तर फ्रण्ट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५१९ सेन्सर्सचा असेल.

फोनमध्ये स्टुडिओ लायटनिंग आणि नाईट्स्केप हे दोन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. पोर्टेट मोडमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो काढताना त्याच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश किती असावा हे स्टुडीओ लायटिंगच्या मदतीने ठरवता येईल तर कमी प्रकाशात फोटो काढताना म्हणजेच एचडीआर मोडच्या मदतीने अगदी दोन सेकंदात फोटो काढण्यासाठी नाईट्स्केप फिचर वापरता येईल.

फोनमध्ये ३७०० एमएएचची बॅटरी आहे. कंपनीचा सध्याचा प्लॅगशिप फोन असणाऱ्या वन प्लस सिक्सच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी ३७ टक्क्यांनी जास्त शक्तीशाली आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी हा फोन खास असेल कारण यामध्ये स्टेबिलायझर म्हणजे फोनमधील ग्राफिक्स स्थिर राहण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा फोन अॅण्ड्रॉइड ९ पायवर काम करेल. या फोनमध्ये स्मार्ट बुस्टर हे विशेष फिचर उपलब्ध करुन देण्यात आले असून यामुळे मोबाइलच्या रॅम तसेच रॉमवर पडणारा ताण कमी करुन बुटिंगसाठी लागणारा वेळ कमी करता येईल. फोनला एनएफसी आणि फोर जी व्होल्ट कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत.