स्मार्टफोन निर्माती कंपनी वनप्लसने आज एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं आहे. बंगळुरू, न्यूयॉर्क आणि लंडन येथे एकाच वेळी या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले बहुप्रतीक्षित वन प्लस 7 आणि वन प्लस 7 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर OnePlus 7 ची बुकिंग यापूर्वीच सुरु झाली आहे. स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर अॅमेझॉनशिवाय क्रोमा आणि रिलायंस डिजीटल स्टोअर्समधुनही हे फोन खरेदी करता येतील.

भारतीय वेळेनुसार बंगळुरूमध्ये आज रात्री सव्वाआठ वाजता या इव्हेंटला सुरुवात होईल. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आणि कंपनीच्या युट्यूब चॅनलवरुन हा इव्हेंट लाइव्ह पाहता येणार आहे. लाँचिंगआधीच या दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन इंटरनेटवर लीक झाले आहेत. वनप्लस 7 मध्ये 90 एचडी डिस्प्ले असू शकतो. या फोनच्या लॉन्चसाठी कंपनीने ‘गो बियॉन्ड स्पीड’ अशी टॅगलाईन दिली आहे. तर, दुसरीकडे सर्वाधिक उत्सुकता ही वन प्लस 7 प्रो बद्दलची आहे. वन प्लस 7 प्रो हा स्मार्टफोन इतर प्रीमियम स्मार्टफोनपेक्षा अधिक चांगला व दमदार असेल असा दावा कंपनीने केला आहे. वन प्लस 7 प्रो स्मार्टफोन प्रीमियम फीचर्ससह लाँच होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5जी सपोर्ट देणारा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 एसओसीसह लाँच केला जाणार असल्याची चर्चा आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षीच्या मोबाईल काँग्रेसमध्ये लाँच झाला होता, त्याचवेळी हा प्रोसेसर कंपनीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये वापरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे वनप्लस 7 प्रो हा 5G सपोर्ट असलेला हा पहिला स्मार्टफोन असू शकतो.

वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 90Hz पेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यापूर्वी अॅपलच्या आयपॅड प्रो मध्ये 120Hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे वनप्लसच्या नव्या फोनचा डिस्प्ले आतापर्यंतचा कंपनीचा सर्वोत्कृष्ट असू शकतो. वन प्लस 7 ची किंमत 38 हजार 999 असू शकते, तर वनप्लस 7 प्रो ची किंमत 49 हजार 999 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

काय असू शकतात वनप्लस 7 प्रो मधील फीचर्स –
-हा फोन 5 जीला सपोर्ट करणारा नेक्स्ट जनरेशन मोबाइल असू शकतो.
-हा फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅमसह 128 जीबी व 256 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार असल्याची चर्चा
-बॅटरी क्षमता 4000 एमएएच असू शकते
-‘वन प्लस 7 प्रो’मध्ये ट्रिपल कॅमेरा सेंसर असण्याची शक्यता
-४८ मेगापिक्सलचा सेंसर कॅमेरा असून यात एक अल्ट्रा वाइड सेंसरशिवाय ऑप्टिकल सेंसर असण्याची शक्यता
-कॅमेरा कॉम्बिनेशन 48+8+16 मेगापिक्सल असे असू शकते
-फोनमध्ये पॉप अप कॅमेरा 16 मेगापिक्सल असू शकतो.
-मोबाइलमध्ये 6.7 इंचाचा कर्व्ड डिस्प्ले (हा एचडीआर१० सह असणार आहे. त्यामुळे हा मोबाइल एचडीआर१० प्लस मध्ये चित्रित केलेल्या शॉट्सना सपोर्ट करण्याची शक्यता )
-वन प्लस 7 प्रो नेबूला ब्लू आणि मिरर ग्रे रंगाच्या पर्यायात उपलब्ध होण्याची शक्यता