गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘स्वस्त’ OnePlus Nord हा नवीन स्मार्टफोन अखेर आजपासून अ‍ॅमेझॉनवर ‘ओपन सेल’मध्ये खरेदी करता येणार आहे. सहा आणि सात ऑगस्ट या दोन दिवशी ‘अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल’मध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय वनप्लस इंडियाच्या अधिकृत वेबासाइटवरुन(OnePlus.in)खरेदी करता येईल. यापूर्वी OnePlus Nord या फोनसाठी 4 ऑगस्ट रोजी ओपन सेलचं आयोजन करण्यात आलं होतं, पण नंतर कंपनीने तो सेल पुढे ढकलला होता. अखेर आजपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.

ऑफर्स –
अ‍ॅमेझॉनच्या ओपन सेलमध्ये OnePlus Nord च्या खरेदीवर काही ऑफरही आहेत. यानुसार एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय एक्स्चेंज ऑफर अंतर्गत 10 हजार 500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. ‘अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड’वरही पाच टक्के रिवॉर्ड पॉइंट आणि पाच टक्के इंस्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. हा फोन 7 ऑगस्टपासून रिलायन्स डिजिटल आणि मायजिओ स्टोअर्समध्येही उपलब्ध होईल. कंपनीने OnePlus Nord हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये आणला असला तरी, सध्या OnePlus Nord च्या केवळ 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिअंटचीच विक्री होणार आहे. तर, 6 जीबी रॅम मॉडेलची विक्री भारतात सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. पण अद्याप नेमकी तारीख समोर आलेली नाही.

स्पेसिफिकेशन्स –
वन प्लसने गेल्या आठवड्यात 21 जुलै रोजी आपला हा स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. यासोबतच कंपनीने अनेक दिवसांनंतर ‘मिड-रेंज सेगमेंट’मध्ये पुनरागमन केलं. OnePlus Nord मध्ये सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 48MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 48MP प्राइमरी कॅमेऱ्याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. वनप्लस नॉर्डमध्ये अल्ट्राशॉट एचडीआर, नाइटस्केप, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, प्रो-मोड, पॅनोरमा, एआय सीन डिटेक्शन, RAW इमेज आणि अल्ट्रा वाइड सेल्फी यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही क्षमता आहे. ब्लू मार्बल आणि ग्रे ऑक्सी या दोन कलर्सचे पर्याय या फोनसाठी आहेत. ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असलेला OnePlus Nord अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS 10.5 वर कार्यरत आहे. यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंत रॅम आहे. 184 ग्रॅम इतकं या फोनचं वजन असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,115mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लुटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत. या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन केलं आहे. तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

किंमत –
OnePlus Nord च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत भारतीय बाजारपेठेत 24 हजार 999 इतकी आहे. तर, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27 हजार 999 रूपये आणि 29 हजार 999 रूपये इतकी आहे.