संततिप्रतिबंधक गोळ्यांमुळे जगात अंडाशयाच्या कर्करोगाने महिलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे एका संशोधनात दिसून आले आहे. जगात २००२ ते २०१२ या काळात अंडाशयाच्या कर्करोगाने मरण पावलेल्यांची संख्या कमी झाली आहे. त्यात २०२० पर्यंत अमेरिका व युरोपीय समुदायात महिलांच्या मृत्यूचे प्राण आणखी कमी होणार आहे. जपानमध्ये ते कमी होईल पण ते फार जास्त असणार नाही. संततिप्रतिबंधक गोळ्यांनी अंडाशयाच्या कर्करोगापासून दीर्घकाळ संरक्षण मिळते, असे इटलीतील मिलान विद्यापीठाच्या प्रा. कालरे ला व्हेलिया यांनी सांगितले.

रजोनिवृत्तीकाळात संप्रेरक उपचार पद्धतीचा वापर व निदान तसेच उपचारांच्या नव्या पद्धती यामुळेही अंडाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार युरोपीय समुदायातील २८ देशांत २००२ ते २०१२ या काळात मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी झाले तर महिलांच्या विशिष्ट वयातील मृत्यूचे प्रमाण लाखात ५.७८ ते ५.१९ इतके कमी झाले.

अमेरिकेत हे प्रमाण १६ टक्के कमी झाले असून २००२ मध्ये दर लाखात मृत्यूचे प्रमाण ५.७६ होते ते २०१२ मध्ये ४.८५ झाले आहे, कॅनडात याच काळात मृत्यूचे प्रमाण ५.४२ ते ४.९५ होते तर जपानमध्ये ते २ टक्क्यांनी कमी झाले असून दर लाखात ३.३ ते ३.२८ होते. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच कमी झाले असून ऑस्ट्रेलियात ते १२ टक्के कमी म्हणजे ४.८४ व ४.२७ तर न्यूझीलंडमध्ये १२ टक्के कमी म्हणजे ५.६१ ते ४.९३ होते.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)