करोनाच्या अनपेक्षित संकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आर्थिक समस्यांबरोबरच बेरोजगारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतामध्येही चित्र फारसं वेगळं नाहीय. भारतामध्येही वेगवेगळ्या क्षेत्रांमधील लाखो लोकं बेरोजगार झाली आहेत. मात्र असं असतानाही भारतातील एका क्षेत्रामध्ये ९३ हजार ५०० हून अधिक नोकऱ्या आहेत. हे क्षेत्र आहे डेटा सायन्स.

ऑनलाइन लर्निग प्लॅटफॉर्म असणाऱ्या ‘ग्रेट लर्निंग’ने केलेल्या अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये भारतात डेटा सायन्स क्षेत्रातील ९३ हजार ५०० हून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून आलं आहे. या अभ्यासामध्ये डेटा सायन्सच्या क्षेत्रालाही करोनाचा फटका बसल्याचे दिसत असले तरी इतर क्षेत्रांपेक्षा इथे चित्र थोडेफार समाधान कारक आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये या क्षेत्रामध्ये एक लाख ९ हजार जागा रिक्त होत्या तिथे मे महिन्यात हा आकडा ८२ हजार ५०० होता आणि अनलॉकच्या प्रक्रियेनंतर यामध्ये आणखीन वाढ होऊन तो ९३ हजारांच्या आसपास आहे. अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये डेटा सायन्सशी संबंधित नोकऱ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. भारतातील अॅनलिटिक्स आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक दिवसोंदिवस टप्प्या टप्प्यात वाढत असल्यानेच या क्षेत्रातील नोकरीच्या संधीही अधिक प्रमामात उपलब्ध आहेत.

या क्षेत्रामध्ये सात वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांसाठी सध्या अधिक संधी उपलब्ध आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये सात वर्षांपेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांसाठी डेटा सायन्स क्षेत्रातील एकूण जागांपैकी १४.९ टक्के जागा रिक्त आहेत. हाच आकडा जानेवारीत १२.५ तर मागील वर्षी ६.७ टक्के इतकाच होता. याच क्षेत्रामध्ये १० ते १५ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांसाठी ऑगस्टमध्ये ११ टक्के जागांवर संधी उपलब्ध आहे. जानेवारीत हा आकडा केवळ ८.६ टक्के इतका होता. तर १५ वर्षांहून अधिक अनुभव असणाऱ्यांनाही या क्षेत्रातील रिक्त जागांपैकी ४.९ टक्के जागांवर नोकरीची सुवर्ण संधी आहे.

बँकिंग, फायनॅन्शियल सर्व्हिसेस आणि इनश्योरन्स म्हणजेच बीएफएसआय या तीन प्रमुख क्षेत्राशी संबंधित नोकऱ्यांमध्ये डेटा सायन्सच्या जाणकारांना चांगली संधी आहे. अॅनलिटीक्स आणि डेटा सायन्सच्या जाणकारांना रोजगार देणारे दुसरे मोठे क्षेत्र हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र म्हणजेच आयटी क्षेत्र असून अॅनलिटीक्ससंदर्भातील ३५ टक्के नोकऱ्या या आयटी क्षेत्रातील आहेत. याचबरोबर औषध कंपन्यांशी संबंधित क्षेत्रामध्येही डेटा सायन्सच्या जाणकारांची मागणी वाढली आहे. ई-कॉमर्स, ऊर्जा, प्रसारमाध्यमे, रिटेल यासारख्या क्षेत्रांमध्येही डेटा सायन्सच्या जणकारांची मागणी वाढली आहे.

काय हवं?

गेल्या काही वर्षांपासून डेटा सायन्स, डेटा विश्लेषण या शब्दांना मोठे महत्त्व प्राप्त झाल्याने या विषयांचा आता शिक्षणात समावेश झाला आहे. राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विदा संबंधित पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची संख्याही वाढली आहे. डेटा अभ्यास हे क्षेत्र आंतरविद्याशाखीय आहे. त्यात संगणकशास्त्र, गणित यांचा समावेश होतो. खासगी कंपन्यांना, शासकीय यंत्रणांना विविध कल जाणून घेण्यासाठी, धोरणे-योजना ठरवण्यासाठी विदा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सांख्यिकी, संगणक विज्ञान, माहिती विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, डेटाबेस व्यवस्थापन, डेटाची देवाणघेवाण असे बरेच विषय या ज्ञानशाखेचा भाग आहेत. डेटा वैज्ञानिक म्हणून काम करताना या सगळ्या विषयांची थोडीबहुत माहिती असणं गरजेचं असतं.

पायथॉन या प्रोग्रामिंग लँगवेजची जाण असणाऱ्यांना या क्षेत्रामध्ये अधिक मागणी आहे. २७ टक्के नोकऱ्यांमध्ये पायथॉनचे कोअर स्किल्स असणाऱ्यांना संधी आहे. त्या खालोखाल जावा अथवा जावास्क्रीप्ट येणाऱ्यांना २२ टक्के संधी आहे. टॅबेल्यूमायक्रोसॉफ्ट पॉवर बीआय, क्लाऊड मॅनेजमेंट, एडब्लूएस, गुगल क्लाऊड यासारख्या गोष्टींचे न्याय असणाऱ्यांना या क्षेत्रात नोकरीसाठी प्राधान्य दिलं जातं.

पगार किती?

या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करणाऱ्यांना वार्षिक पगार हा ९.५ लाख रुपयांपासून सुरु होतो. तर दहा वर्षांपेक्षा अधिक अनुभव असणाऱ्यांना वर्षाला २५ ते ५० लाखांच्या दरम्यान वेतन मिळू शकते असं ‘ग्रेट लर्निंग’च्या अभ्यासामध्ये दिसून आलं आहे.