पॅनासोनिक कंपनी इनव्हीजिबल टीव्हीची निर्मिती करत असून तो सर्वात पहिल्यांदा भारतात लॉंच करणार आहे. त्यामुळे भारतीयांना या अनोख्या टीव्हीचा आनंद सगळ्यात आधी घेता येणार आहे. या टीव्हीबाबत मागील अनेक महिन्यांपासून चर्चा असून त्याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. अखेर ही उत्सुकता संपणार असून ग्राहकांना हा टीव्ही उपलब्ध होणार आहे.
पॅनासोनिक कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष शर्मा यांनी या गोष्टीबाबत भाष्य केले आहे. आता याबाबात काही सांगणे घाईचे होऊ शकते. मात्र कंपनी भारतात आपले हे नव्याने येणारे उत्पादन सर्वात आधी लॉंच करणार आहे. यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या टीव्हीच्या किंमतीबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. आता पॅनासोनिक कंपनीचा टीव्हीच्या बाजारातील सहभाग ७.५ टक्के इतका आहे आणि येत्या काळात प्रिमियम रेंजमधील ४के अल्ट्रा हाय डेफीनेशनच्या टीव्हीच्या बाजारात आपला सहभाग वाढविण्याचा विचार आहे. इनव्हीजिबल टीव्ही बनविण्याच्या बाबतीत पॅनासोनिक आपले उद्दीष्ट साध्य करणार आहे.

हा टीव्ही म्हणजे एक पारदर्शक पॅनल असणार आहे. जेव्हा टीव्ही बंद असेल तेव्हा तो एखाद्या काचेच्या पॅनलसारखा दिसेल. त्यामुळे या पॅनेलला पाहिल्यावर हा टीव्ही आहे हे लक्षातही येणार नाही. आणखी एक बाब म्हणजे या पॅनलला एक विशेष सेन्सर बसविण्यात येणार आहे. ज्यामुळे व्यक्तीने या टीव्हीसमोर समोर येऊन हात हलविला किंवा त्याला स्पर्श केला तर टीव्ही चालू होणार आहे. मागील वर्षी अशा प्रकारचा टीव्ही भारत आणि जपानमध्ये दाखविण्यात आला होता. पहिल्या वर्जनमध्ये एलईडी स्क्रीनचा वापर करण्यात आला होता. मात्र आताच्या टीव्हीमध्ये ओएलईडीचा वापर कऱण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.