डॉ. शिरीष एम. हस्तक

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताचं प्रमाण (स्ट्रोक) वाढलं आहे. २९ ऑक्टोबर रोजी जागतिक पक्षाघात दिन असून त्यानिमित्ताने या आजाराला कसं दूर ठेवता येऊ  शकतं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाने आपण पक्षाघाताचा धोका कमी करू शकतो. दररोज ३० मिनिटं व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. यामुळे जीवनशैलीत सुधारणा होऊन पक्षाघात टाळता येऊ  शकतो.

तुम्हाला चालताना किंवा कोणतीही वस्तू हातात धरताना अडचण येते का?

तुम्हाला बोलताना शब्द स्पष्ट उच्चारता येत नाही का? असं असेल तर वेळीच सावधान! ही पक्षाघाताची (स्ट्रोक) लक्षणं असू शकतात. जेव्हा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याने अडथळे निर्माण होतात, तेव्हा मेंदूच्या त्या भागावरील नियंत्रण जातं. अगदी थोडय़ा काळासाठी तरी ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला तरी मेंदूतील पेशी मरू लागतात. एकदा प्राणवायूच्या कमतरतेमुळे पेशी मरायला लागल्या की मेंदूच्या त्या विशिष्ट भागावरील नियंत्रण कमी होतं. त्यामुळे पक्षाघाताचा झटका येतो.

इस्के मिक स्ट्रोक दोन प्रकारचे स्ट्रोक आहेत, ज्यामध्ये मेंदूचा एक भाग रक्तप्रवाह गमावतो, तर दुसऱ्या प्रकारात रक्तस्राव रुग्णाच्या मेंदूतून होतो. पक्षाघाताचं पटकन निदान होणं गरजेचं आहे. कारण पक्षाघात हे मृत्यूचं कारण ठरू शकतं. याशिवाय रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करावा लागतो. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असलेल्यांना पक्षाघाताचा धोका सर्वाधिक असतो. त्याचप्रमाणे धूम्रपान केल्यामुळेही पक्षाघाताचा धोका संभावू शकतो.

पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. पक्षाघात झालेल्या प्रत्येक रुग्णावर उपचार हे त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार भिन्न असू शकतात. रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन काय उपचार द्यावेत हे डॉक्टर ठरवतात. सुरुवातीच्या काळातच म्हणजे उपचार झाल्यास ब्रेन स्ट्रोकचा (पक्षाघात) झटका आलेला रुग्ण बरा होऊ  शकतो. याशिवाय चांगली जीवनशैलीसुद्धा पक्षाघाताचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त राहिल्याने पक्षाघात टाळता येऊ  शकतो.

व्यायामाचे फायदे

दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवता येऊ  शकतो. उच्च रक्तदाब हा पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी एक आहे. त्यामुळे पक्षाघात होण्यापासून रोखण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर नियमित व्यायाम केल्यास लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह टाळता येऊ  शकतो. अनेक सर्वेक्षणांतून समोर आलं आहे की, व्यायामामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येऊ  शकतं.

*    नियमित व्यायाम के ल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करावा. मुळात आपल्याला आठवडय़ातून पाच वेळा व्यायाम करणं आवश्यक आहे. आपलं शरीर परवानगी देत असेल तरच आपण जोरदार व्यायाम करणं आवश्यक आहे. मात्र अतिरिक्त व्यायाम करणं टाळावं. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हळूहळू व्यायामात बदल करा.

* चालणं, धावणं, एरोबिक्स करणं, पोहणं, सायकल चालवणं किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करा. जे आपल्याला आपल्या स्नायू आणि हाडांचं आरोग्य बळकट करण्यास मदत करेल. अगदी घरगुती कामं करणंसुद्धा एक प्रकारचा व्यायाम आहे. नृत्य हा आणखी एक पर्याय आहे. यामुळे आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो.

* पक्षाघाताचा झटका आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्लय़ानुसार व्यायामाची निवड करा. आपण एक फिटनेस ट्रेनरही ठेवू शकता. जो आपल्याला योग्य पद्धतीने व्यायाम करण्यास मदत करू शकतो.

* नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणंही आवश्यक आहे. याशिवाय धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन करणं टाळावं. कारण पक्षाघातामुळे जीवघेणे परिणाम रुग्णाला सहन करावे लागतात. यासाठी पक्षाघाताबद्दल समाजात जागरूकता निर्माण के ली पाहिजे. अनेक लोकांना पक्षाघाताबद्दल माहिती नसते. त्यामुळे लोकांना याबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून पक्षाघात वेळीच लक्षात आल्यास रुग्णावर तातडीने उपचार होऊन तो बरा होऊ  शकतो.