Paytm ची सहायक कंपनी ‘पेटीएम मनी’ने आता आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्यूचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगची (एफअँडओ) सुविधा सुरु केली आहे. पेटीएमने ही सुविधा सर्व एफअँडओ ट्रेड्ससाठी माफक दरात म्हणजेच १० रुपये प्रतिऑर्डर इतक्या किमतीत सादर केली आहे.

फ्यूचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगची सुविधा सुरूवातीला केवळ ५०० युजर्सना मिळेल. नंतर येत्या दोन आठवड्यांमध्ये ही सेवा सर्व युजरसाठी सुरू होईल. सुरुवातीला, कंपनी अँड्रॉइड आणि वेबवरील निवडक वापरकर्त्यांना ॲक्सेस देईल, जेणेकरून त्यांच्याकडून फीडबॅक मिळू शकेल. नंतर पुढील दोन आठवड्यात सर्व व्यापारी आणि आयओएस प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांसाठी ही सेवा व्यावसायिकपणे उपलब्ध होईल. आपल्या प्लॅटफॉर्मवर एफअँडओ सुरू झाल्यावर पुढील १८ ते २४ महिन्यांमध्ये प्रतिदिन १.५ लाख कोटी रुपयांचा कारभार आणि १० लाख ट्रेड्सचे पेटीएम मनीचे लक्ष्य आहे.

‘इंट्राडे’ ट्रेडिंगसाठी १० रुपये आकारले जातील, तर डिलिव्हरीच्या बाबतीत कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या कमी शुल्काचा फायदा अनुभवी आणि प्रथमच ट्रेडिंग करणाऱ्या दोन्ही व्यापाऱ्यांना होईल आणि ते सुरक्षित वातावरणात सर्वोत्तम उत्पादनांसह त्यांच्या मोबाइलवर फ्यूचर्स आणि पर्यायांमध्ये सहज व्यापार करू शकतील, असं कंपनीने म्हटलं. पेटीएम मनीवर स्टॉक्‍स, डायरेक्ट म्‍यूचुअल फंड्स, ईटीएएफ, आयपीओ, एनपीएस आणि डिजिटल गोल्डसारख्या अन्य सेवाही उपलब्ध आहेत.