मध्यम वयात शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त महिलांमध्ये उतारवयात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका ९० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. तर क्वचित व्यायाम करणाऱ्या महिलांच्या तुलनेने तंदुरुस्त महिलांमध्ये सरासरी अकरा वर्षांनंतर स्मृतभ्रंश विकसित होतो, असेही या अभ्यासात आढळले आहे.

या अभ्यासात आढळून आलेले परिणाम सकारात्मक आहेत. मध्यम वयात दयाच्या आरोग्याबाबत योग्य काळजी घेतल्यास स्मृतिभ्रंश  टाळता येते किंवा प्रलंबित करता येतो असे स्वीडनच्या गोथनबर्ग विद्यापीठातील हेलेना होर्डर यांनी म्हटले. याबाबत अधिक अभ्यास करणे गरजेचे असून व्यायाम करण्यास सुरुवात केल्याने त्याचा प्रभाव स्मृतिभ्रंशावर होतो का, त्याचप्रमाणे आयुष्यातील कोणत्या टप्प्यातील तंदुरुस्त असणे स्मृतिभ्रंशाविरोधात अधिक परिणामकारक आहे, याबाबत अधिक अभ्यास करण्याची गरज आहे, असेही होर्डर यांनी म्हटले. हा अभ्यास न्यूरोलॉजी नियतकालिकात प्रसिद्ध  करण्यात आला आहे. यासाठी सरासरी १९१ महिलांच्या सायकल चालविण्याच्या क्षमतेचा अभ्यास  करण्यात आला. यावेळी त्यांच्या दयाच्या क्षमतेची चाचणी करण्यात आली. त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे तीन गटात विभाजन करण्यात आले. या महिलांना पुढील ४४ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला आणि त्यांची स्मृतिभ्रंशासाठी सहा वेळा चाचणी घेण्यात आली. यातील ४४ महिलांमध्ये स्मृतिभ्रंश विकसित झाल्याचे आढळले. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त महिलांमध्ये पाच टक्के तर माफक प्रमाणात तंदुरुस्त महिलांमध्ये २५ टक्क्यांनी आणि तंदुरुस्त नसणाऱ्या ३२ टक्के महिलांमध्ये स्मृतिभ्रंशाचे निदान झाले. या अभ्यासातून शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त महिलांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचा धोका ९० टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. ज्या महिलांनी काही अडचणींमुळे नियमित व्यायाम करणे थांबविले त्यातील ४५ टक्के मिंहलांमध्ये उतारवयात स्मृतिभ्रंश विकसित झाला. हा अभ्यास कमी महिलांवर करण्यात आला असून या सर्व महिला स्वीडनमधील होत्या, त्यामुळे याबाबतीत अधिक अभ्यासाची गरज असल्याचे होर्डर यांनी सांगितले.