व्हिडीओ गेम्सचे आकर्षण हे सर्वांमध्येच असते. पण काही तज्ज्ञांनुसार अतिप्रमाणात व्हिडीओ गेम्स खेळल्यास त्यांचा डोळ्यांवर आणि आरोग्यावर परिणाम होतो. पण, याच व्हिडीओ गेम्समुळे मेंदुच्या चालनेत वाढ होऊ शकते. काही विशिष्ट ठराविक व्हिडीओ गेम्स खेळल्याने मेंदुच्या चालनेत वाढ होते, असे एका संशोधनात आढळले आहे.
लंडन येथील ‘क्वीन मेरी युनिवर्सिटी’ आणि ‘युनिवर्सिटी कॉलेज लंडन’च्या (यूसीएल) संशोधकांनी ७२ जणांचे सहा ते आठ आठवडे परीक्षण केले. या परीक्षणात त्यांना ४० तास गेम्स खेळण्यास देऊन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिलेल्या वेळी एकाधिक कल्पना विचार यांची पाहणी करण्यात आली. या ७२ जणांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. त्यानुसार, एका गटास ‘स्टार क्राफ्ट’ गेम खेळण्यास देण्यात आला ज्यामध्ये मेंदूला चालना देऊन विचार करण्याची गरज असते. तर, दुस-या गटाला ‘द सिम्स’ हा गेम देण्यात आला. ज्यात बुद्धिची किंवा योजनांची गरज नसते. हे गेम्स खेळण्यास देण्यापूर्वी आणि नंतर काही मानसिक चाचण्या करण्यात आल्या. त्यानुसार असे आढळले की, ‘द सिम्स’ गेमपेक्षा ‘स्टार क्राफ्ट’ गेम खेळणारे मानसिक लवचिकतेच्या कार्यामध्ये जलद आणि अधिक अचूक आहेत.
त्यामुळे व्हिडीओ गेम्सची निवडदेखील महत्वाची ठरते. जर तुम्ही अती गुंतागुंतीचे आणि विचार करण्यास लावणारे गेम खेळलात तर तुमच्या बुद्धी चालनेत वाढ होईल आणि बौद्धिक कामात याचा फायदा होऊ शकतो.