चीनच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाच्या त्वरित निदानासाठी नवी चाचणी पद्धती शोधून काढली असून त्यामुळे केवळ रक्ताच्या एका थेंबाद्वारे कर्करोगाचे निदान शक्य झाले आहे.

त्सिंघुआ विद्यापीठातील संशोधकांनी या चाचणीसाठी एचएसपी९०ए हे प्रथिनांचे किट शोधून काढले आहे. संशोधक लुओ योंगझांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एचएसपी९०ए हे प्रथिनांचे किट तयार केले असून त्यामुळे शरीरातील प्रथिनांमध्ये वाढ करून त्यांना स्थिरता देण्यात येते.

याचा अर्थ या किटद्वारे मोठय़ा प्रमाणात प्रथिने कोणत्याही वेळी तयार करता येणे शक्य असल्याचे चीनमधील एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. चीनमधील आठ रुग्णालयांमधील २,३४७ रुग्णांवर या किटचा वापर करण्यात आला. या किटद्वारे कर्करोग शोधण्याचा प्रथमच यशस्वी प्रयोग करण्यात आला. कर्करोगाचे निदान लवकर होत असल्याने या किटला चीन आणि युरोपियन बाजारपेठेत मान्यता देण्यात आली आहे. कर्करोग हा रोगांचा समूह आहे. त्यामुळे तो शरीराच्या कोणत्याही भागात पसरू शकतो. २०१५मध्ये जगभरातील ९०.५ दशलक्ष लोकांना कर्करोग होता. कर्करोगामुळे जगभरात ८.८ दशलक्ष म्हणजेच १५.७ टक्के लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो. चीनमध्ये २.८ दशलक्ष लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो.