रिअलमी कंपनीने भारतीय बाजारात आपल्या नवीन Narzo 30 सीरिजमधील दोन फोन आणलेत. कंपनीने भारतात आज (दि.२४) दोन नवीन स्मार्टफोन Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A लाँच केले. यातील Realme Narzo 30 Pro एक 5G स्मार्टफोन असून भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केलाय, तर Realme Narzo 30A हा 4जी स्मार्टफोन आहे. Realme Narzo 30 Pro 5G हा फोन भारतात मीडियाटेक Dimensity 800U प्रोसेसरसह लाँच करण्यात आलाय, तर Realme Narzo 30A मध्ये मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर आहे.

Realme Narzo 30 Pro 5G स्पेसिफिकेशन्स :-
Realme Narzo 30 Pro 5G अँड्रॉइड 10 वर आधारित Realme UI चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 800U 5डी प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये तीन कार्ड स्लॉट असून यात 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ v5.1, GPS/A-GPS आणि टाइप सी पोर्ट आहेत. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. तसेच, 30W डर्ट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरीही मिळेल.

Realme Narzo 30A स्पेसिफिकेशन्स :-
Realme Narzo 30A मध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित Realme UI आहे. याशिवाय 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून वॉटरड्रॉप नॉच आहे. मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसरचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. तर, फोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा मोनोक्रोम लेन्स सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS आणि टाइप सी पोर्ट आहेत. यातही रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Realme Narzo 30A मध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

Realme Narzo 30 Pro 5G, Realme Narzo 30A ची किंमत :-
Realme Narzo 30 Pro 5G च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. हा फोन स्वॉर्ड ब्लॅक आणि ब्लेड सिल्वर अशा दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल. तर, Realme Narzo 30A च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजची किंमत 8 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 64 जीबी व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. हा फोन लेजर ब्लॅक आणि लेजर ब्लू अशा दोन रंगात खरेदी करता येईल. Realme Narzo 30 Pro 5G ची विक्री ४ मार्च रोजी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर सुरू होईल, तर Realme Narzo 30A चा सेल ५ मार्चला असेल.