रिअलमी कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतातील आपला पहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला. आजपासून या टीव्हीची विक्री सुरू होत असून कंपनीकडून खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी 12 वाजेपासून या टीव्हीसाठी सेलला सुरूवात होत असून 32 इंच आणि 43 इंच असे दोन पर्याय असलेला Realme Smart TV फ्लिपकार्ट, रिअलमी इंडियाची वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल. पहिल्या सेलमध्ये या टीव्हीच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सही आहेत. 32 इंच मॉडेलच्या Realme Smart TV ची किंमत 12,999 रुपये आहे. तर, 43 इंच मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

काय आहे ऑफर्स :-
रिअलमी टीव्ही फ्लिपकार्टवरुन अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआयचाही पर्याय असेल. तसेच, 31 जुलैआधी हा टीव्ही खरेदी करणाऱ्यांना 6 महिने ‘युट्यूब प्रीमियम’चं मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. दुसरीकडे, हा टीव्ही रिअलमीच्या वेबसाइटवरुन खरेदी केल्यास रिअलमी एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकतो.

स्पेसिफिकेशन्स :-
25 मे रोजी लाँच झालेल्या Realme Smart TV मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. टीव्हीच्या 32 इंच मॉडेलमध्ये 1366×768 पिक्सल म्हणजे एचडी रिझोल्युशन पॅनल आहे. तर, 43 इंचाच्या मॉडेलमध्ये 1920×1080 पिक्सल फुल एचडी डिस्प्ले आहे. 1जीबी रॅम आणि 8जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या रिअलमी टीव्हीमध्ये मीडियाटेक MSD6683 प्रोसेसर आहे. अँड्रॉइड टीव्ही 9 पाय ओएसवर कार्यरत असून यामध्ये गुगल प्ले स्टोअरचा अ‍ॅक्सेस मिळतो. दर्जेदार पिक्चर क्वॉलिटीसाठी यामध्ये HDR10 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच दमदार साउंडसाठी डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 24 वॅटचे चार स्पीकर दिले आहेत. गुणवत्ता तपासण्यासाठी या टीव्हीच्या अनेक चाचण्या (टेस्ट) घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये 20 डिग्री तापमान टेस्ट, 760 एमएम ड्रॉप टेस्ट, 5000 वेळा रिमोट बटण टेस्ट आणि 5500 वेळेस पॉवर ऑन-ऑफ टेस्ट, घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.0, तीन HDMI पोर्ट आणि दोन युएसबी पोर्टचे पर्यायही आहेत.