विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांची पडताळणी करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या संकुलांमध्ये नियमितपणे तपासणी शिबिरे घेण्यात यावीत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. वाढत जाणाऱ्या या आजारांचे लवकर निदान होऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, या हेतूने ही सूचना करण्यात आली आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना पत्रे लिहिली आहेत. शाळा-महाविद्यालयांचे संकुल तंबाखूमुक्त ठेवणे, शाळेच्या उपाहारगृहामध्ये शर्करायुक्त कृत्रिम पेये आणि चटपटीत खाद्यपदार्थ (जंक फूड) आदी अनारोग्यकारक पदार्थ ठेवण्यावर र्निबध आणणे आणि तंबाखू सोडण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्रे सुरू करणे आदी उपाययोजना करण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

शाळा-महाविद्यालयांच्या संकुलांमध्ये शारीरिक हालचालयुक्त उपक्रम-खेळांना तसेच योगसाधनेला प्रोत्साहन द्यावे, हवेच्या प्रदूषणाला आळा बसेल असे उपाय करावेत, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

‘जोखमीच्या वर्तनाला प्रतिबंध करणे आणि युवकांचे आरोग्य वाढीस लागण्यासाठी उपाययोजना करणे हाच आरोग्याची स्थिती सुधारण्याचा प्रभावी मार्ग आहे. याबाबत शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात,’ असे आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

‘व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणारी जोखमीची वर्तणूक ही प्रामुख्याने तरुण वयात घडते. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, १८ ते २९ वर्षे वयोगटात नैराश्यासह अन्य मानसिक व्याधी दिसून येण्याचे प्रमाण सुमारे नऊ टक्के आहे’,  असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.