अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज (दि.5) Reliance Jio GigaFiber ही सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे. रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत(12 ऑगस्ट) कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बहुप्रतिक्षित जिओ गिगाफायबर सेवेबाबत घोषणा केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून जिओ गीगाफायबरसाठी देशातील काही निवडक शहरांमध्ये याची चाचणी सुरू होती. अखेर आजपासून या सेवेस प्रारंभ होणार आहे.

जिओ गिगाफायबर सेवेसोबतच कंपनी आज(दि.5) फ्री टेलिव्हिजन आणि फ्री सेट-टॉप बॉक्स प्लॅनचे डिटेल्सही सादर करणार आहे. गत सुमारे एक वर्षापासून गिगाफायबर सेवेची चाचणी सुरू होती, या चाचणीशी निगडीत युजर्सना कंपनीकडून मोठं गिफ्ट दिलं जाण्याची शक्यता आहे. प्रिव्ह्यू ऑफर अंतर्गत कंपनी जवळपास 5 लाख ग्राहकांना फ्री होम ब्रॉडबँड सेवेची ऑफर देऊ शकते.

गिगाफायबर प्लॅन्सची रेंज –
700 ते 10 हजार रुपयांदरम्यान जिओ गीगाफायबरचे विविध प्लॅन असतील. किती प्लॅन असणार आणि कोणत्या प्लॅनमध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार याबाबत आज खुलासा केला जाईल. आवश्यकतेनुसार युजर्स प्लॅनची निवड करु शकतात.

काय मिळणार मोफत –
जिओ गिगाफायबरच्या कनेक्शनसह ग्राहकांना मोफत 4K सेट-टॉप बॉक्स मिळेल. जिओच्या आधुनिक सेट-टॉप बॉक्सच्या मदतीने एकसाथ चार जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करु शकतील. याशिवाय सेट-टॉप बॉक्समध्ये खास मल्टी-प्लेयर गेमिंग फीचर देखील असणार आहे, याद्वारे एकाचवेळी चार प्लेयर्स खेळू शकतील. तसंच, गिगाफायबर कनेक्शनसह मोफत 4K LED TV देखील मिळेल. हा टीव्ही जिओ फॉरेव्हर अॅन्युअल प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना मिळेल. ग्राहकांना JioFixedVoice लाइन सेवाही मिळेल. या सेवेद्वारे युजर लँडलाइनद्वारे देशभरात कोणत्याही क्रमांकावर मोफत कॉलिंग करु शकतील.

वेगळ्या DTH कनेक्शनची आवश्यकता नाही –
जिओचा आधुनिक सेट-टॉप बॉक्समध्ये ग्राहकांना लोकल केबल ऑपरेटर्सद्वारे ऑफर केले जाणारे सर्व टीव्ही चॅनल्स उपलब्ध असणार आहेत. म्हणजे ग्राहकांना वेगळं डीटीएच कनेक्शन घेण्याची गरज नाही. याद्वारे ग्राहकांना JioCinema, JioTV आणि JioSaavn या सेवांचाही लाभ मिळेल. अनेक श्रेणींमध्ये हा सेट-टॉप बॉक्स व्हर्चुअल रिअॅल्टी आणि मिक्स्ड रिअॅल्टीला सपोर्ट करेन.

मिळणार 1Gbps पर्यंत स्पीड –
रिलायंस जिओ आपल्या होम ब्रॉडबँड सेवेमध्ये ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट सेवा पुरवणार आहे. जिओ फायबरमध्ये युजर्सना 100Mbps ते 1Gbps पर्यंत स्पीड मिळेल. जिओ 700 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 100Mbps आणि प्रीमियम प्लॅनमध्ये 1Gbps स्पीड मिळेल. या दोन्ही प्लॅन्सच्या दरम्यान अन्य विविध प्लॅन्सचाही समावेश असेल.

इंस्टॉलेशन –
जिओ गिगाफायबरचं इंस्टॉलेशन पूर्णतः मोफत असेल. काही दिवसांसाठी ग्राहकांना मोफत इंस्टॉलेशन करुन मिळेल. मात्र जिओ गिगाफायबरसह येणाऱ्या राउटरसाठी कंपनी ग्राहकांकडून अडीच हजार रुपये आकारेल , ते देखील रिफंडेबल असतील.