देशात इंटरनेट साक्षरतेला गती देण्यासाठी रिलायंस जिओने ‘डिजीटल उडान’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. रिलायन्स जिओने फेसबुकच्या सहकार्याने डिजीटल उडान ही मोहिम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत दर शनिवारी जिओ युजर्सना सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा वापर कसा करावा याबाबत टिप्स दिल्या जातील.  बुधवारी कंपनीकडून या मोहिमेबाबत माहिती देण्यात आली.

भारतात स्मार्टफोनचे युजर्स आणि इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणाऱ्यांसाठी बऱ्याच अडचणी येत असतात आणि भारतीय भाषांमध्ये याबाबतचे योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसल्यामुळे युजर्सना अडचणीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन रिलायन्स जिओने फेसबुकच्या सहकार्याने डिजीटल उडान या नावाने नवीन इंटरनेट साक्षरता मोहीम सुरू केली आहे.

जिओच्या या मोहिमेअंतर्गत युजर्सना ऑडिओ आणि व्हिडिओ माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी जिओने फेसबुकसोबत भागीदारी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही मोहिम देशातील 13 राज्यांमध्ये  200 ठिकाणी सुरू केली जाईल, त्यानंतर येत्या काही महिन्यात सात हजार ठिकाणी ही मोहिम सुरू होईल. यात इंटरनेट साक्षरतेला अतिशय मनोरंजनात्मक पध्दतीत सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

”भारतीय ग्राहकांना डिजिटल लाइफचा उत्तम अनुभव मिळावा यासाठी जिओ नेहमीच प्रयत्नशील आहे. 100% डिजिटल साक्षरतेसाठी देशातील प्रत्येक शहरात आणि गावात ही मोहिम घेऊन जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे”, अशी माहिती रिलायंस जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी दिली.