‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या नियतकालिकामध्ये छापून आलेल्या एका शोध प्रबंधामध्ये लिखित आणि तोंडी वादविवाद संदर्भातील महत्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार एखाद्या विषयावर वादविवाद करताना आपला मुद्दा थेट बोलण्यातून मांडणे हे लिखाणातून मांडलेल्या मुद्द्यापेक्षा जास्त प्रभावशाली असल्याचे सिद्ध झाले आहे. जर एखाद्या राजकीय मुद्द्यावर समोरासमोर बसून चर्चा किंवा वादाविवाद केला, तर तो जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेतला जातो. या उलट हाच वाद जर लिखित स्वरुपात म्हणजे कमेन्ट, मेसेज किंवा ईमेलच्या स्वरूपात असेल तर मुद्दा जाणून घेण्याआधीच अनेकजण त्याला विरोध करण्याच्या मन:स्थितीत जातात असे या अभ्यासात म्हटले आहे.

सोशल मीडियावर कमेन्टमधून होणाऱ्या वादाविवादामागे लिखीत स्वरुपातील वाद-प्रतिवाद हेच मुख्य कारण असते. या अभ्यासासाठी करण्यात आलेल्या प्रयोगात ३०० स्वयंसेवकांना लढाई, गर्भपात आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत याविषयी वाद-प्रतिवाद ऐकण्यास, पाहण्यास आणि वाचण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणत्या माध्यमातील वाद-प्रतिवाद जास्त चांगल्या प्रकारे समजले याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून संशोधकांनी प्रत्यक्षातील वाद-विवाद जास्त चांगल्या प्रकारे समजतात असा निष्कर्ष काढला. जे लोक एखाद्याच्या मताशी असहमत होते त्यांचे वागणे मत मांडणाऱ्यांबद्दल हिंसक होते. तर एखाद्याच्या मताशी सहमत असणाऱ्यांचे वागणे शांत स्वरुपाचे होते.

आवाज मानवाला जास्त चांगल्या प्रकारे संवेदना पोहचवू शकतो आणि जबाबदारीचे भान करुन देतो असे मत बर्कले विद्यापिठातील वैज्ञानिक ज्युलियाना यांनी व्यक्त केले आहे. आम्ही केलेल्या आणखीन एका प्रयोगामध्ये एका राजकारण्याचे भाषण एकाला वाचायला दिले आणि नंतर दुसऱ्या दिवशी तेच भाषण ऐकायला सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने दोन्ही प्रकारांपैकी ऐकलेल्या भाषणाचे मुद्दे अधिक जास्त पटल्याचे मत व्यक्त केल्याचे ज्युलियाना यांनी सांगितले. या अभ्यासामधून सोशल मीडियावर नेत्यांच्या भाषांमुळे मतांचे ध्रुविकरण होत असल्याचे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर असा टोकाचा वाद-विवाद होण्याने हिसंक वृत्ती वाढते तसेच मतांचे ध्रुविकरण होते.