अनेकदा आपल्या घरात असणारे पाळीव प्राणी आपल्याला काय सांगू पाहात आहेत, याचा नेमका अर्थ आपल्याला लावता येत नाही. त्यांच्या कृतीतून त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना काय सांगायचं आहे हे पटकन माणसांच्या लक्षात येत नाही. तेव्हा पाळीव प्राण्यांच्या कृतीचा किंवा त्यांच्या विशिष्ट आवाजाचा अर्थ उलगडून ते इंग्रजी भाषेत तुम्हाला समजवणारं मशीन नॉर्थर्न एरिजोना यूनिव्हर्सिटीचे संधोधक तयार करत आहे.
आर्टीफिशिअल इंटिलेजन्सी या प्रणालीवर आधारित हे मशीन असणार आहे. हे मशीन प्राण्याचे हावभाव, कृती टिपून त्याचा अर्थ समजावून सांगण्यास मदत करणार आहे. दहा वर्षांच्या आता ही प्रणाली कार्यान्वित करण्याचा संशोधकांचा प्रयत्न असणार आहे. सध्या वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांच्या कृती, त्यांचे हावभाव आवाज यांचे नमुने गोळा करून यावर अधिक संशोधन केलं जातं आहे. या नमुन्यांवर संशोधकांचा एक चमू अभ्यास करत आहे. आर्टीफिशिअल इंटिलेजन्सीद्वारे प्राण्याचे हावभाव टिपून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, याबद्दल विस्तृतपणे ही मशीन सांगणार आहे. इंग्रजी भाषेत ही मशीन त्यांच्या कृतीचा अर्थ उलगडून सांगणार आहे.