सातत्याने खुर्चीत बसून काम करणाऱ्यांना अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. ‘द लॅन्सेट’ या आरोग्यविषयक लिखाण करणाऱ्या नियतकालिकाने हे संशोधन प्रसिद्ध केले आहे.

तासन्तास खुर्चीत बसून काम केल्यामुळे अकाली मृत्यूचा धोका अधिक असल्याने अशा कर्मचाऱ्यांना काही वेळनंतर विश्रांती अत्यावश्यक असल्याचे या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. शेकडो लोकांच्या वैद्यकीय अहवालांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बैठय़ा कामापेक्षाही टीव्ही पाहणे अधिक धोकादायक असल्याचेही हे संशोधन सांगते. आरोग्याचे हे धोके टाळण्यासाठी आठवडय़ातून १५० मिनिटे हलका व्यायाम करणे अत्यावश्यक असल्याचे ‘नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हिस’ने स्पष्ट केले आहे.

बैठय़ा कामामुळे ह्रदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढतो हे सर्वानाच ठाऊक झाले आहे. मात्र, या आजारांमुळे जागतिक पातळीवर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या आजारांमुळे ५.३ दशलक्ष लोकांचा वर्षांला मृत्यू होतो. धूम्रपानामुळे होणाऱ्या (५.१ दशलक्ष) मृत्यूपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी दररोज व्यायाम करणे आणि कार्यालयात काही वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांच्या आहारी जाऊ नये असेही ‘द लॅन्सेट’ने म्हटले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)