बोस्टन : सोडियमचे आहारातील प्रमाण वाढल्याने हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढते व अकाली मृत्यूही येऊ शकतो, असा इशारा एका अभ्यासाअंती देण्यात आला आहे. दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमिऑलॉजीने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधानुसार या संशोधनात तीन हजार व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. त्यात रक्तदाब वाढण्यापूर्वी व नंतरच्या अवस्थांमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात मिठाचे जास्त प्रमाण असलेले अन्न खाण्याचा थेट संबंध रक्तदाब वाढून हृदयविकाराचा झटका येण्याशी असल्याचे निष्पन्न झाले. सोडियमचे मापन कठीण असते. तुम्ही किती सोडियम खाता हे नेमके सांगणे कठीण असते, असे ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलच्या नॅन्सी कुक यांनी सांगितले. सोडियमचे बाहेर टाकण्यात आलेले अवशेष यात मोजणे ही एक पद्धत आहे. त्यात लघवीतील सोडियमचे प्रमाण मोजता येते. त्यावरून दिवसाला ती व्यक्ती किती सोडियमचे सेवन करीत असावी याचा अंदाज घेता येतो. त्यासाठी चोवीस तासांतील लघवीचे नमुने घ्यावे लागतात. असे असले तरी अनेक दिवसांचे नमुने घेऊन त्याचा अंदाज घेतल्यास तो जास्त अचूक ठरू शकतो. कावासाकी सूत्रही यात वापरले जाते, त्यात सरासरी मूत्र नमुने व पाठोपाठचे नसलेले नमुने यांचा वापर केला जातो. त्या पद्धतीनुसारही सोडियमचे आहारातील प्रमाण हे मृत्यूस कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. अनेकदा सोडियमचे प्रमाण अचूक मोजले जात नाही,  त्यामुळे काही गफलती निदानात होऊ शकतात.

काही अभ्यासांमध्ये सोडियम सेवनाच्या प्रमाणाबाबत योग्य अंदाज केला जात नाही, त्यामुळे चुकीचे निष्कर्ष निघतात पण सोडियमचे जास्त प्रमाण हे शरीराला  घातक असते. तयार अन्नपदार्थामध्ये मिठाचे प्रमाण सर्वाधिक असते, त्यामुळे ते हानीकारक ठरतात. शिवाय आहारात मीठ चवीपुरतेच वापरायचे असते हे विसरून आपण वरून मीठ घेत असतो, त्याचा फार मोठा फटका आरोग्यास बसत असतो.