Samsung Galaxy A31 ची किंमत 1,000 रुपयांनी कमी झाली आहे. लाँचिंगनंतर एका महिन्यामध्येच कंपनीने या फोनची किंमत कमी केली आहे. किंमतीतील कपातीसह Samsung ने ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफरचीही घोषणा केली आहे.

दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए31 हा फोन भारतात जूनमध्ये लाँच केला होता. हा फोन तीन रंगांच्या पर्यायासह एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे, मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Samsung ने या फोनसाठी काही ऑफर्सचीही घोषणा केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 या फोनची लाँचिंगवेळी किंमत 21,999 रुपये होती, आता हा फोन 20,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. फोन अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर नव्या किंमतीसह उपलब्ध झाला आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे Samsung Galaxy A31 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,000 रुपये कॅशबॅक ऑफरचीही घोषणा कंपनीने केली आहे. ही ऑफर ऑफलाइन प्लॅटफॉर्मसाठी आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Samsung Galaxy A31 specifications :-
ड्युअल-सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI वर कार्यरत आहे. यामध्ये 6.4 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) इन्फिनिटी-यू डिस्प्ले असून मीडियाटेक हीलियो पी65 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. 512 जीबीपर्यंत माइक्रोएसडी कार्डचा सपोर्टही फोनला आहे. याशिवाय फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5,000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यातील 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर पुढील बाजूला सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.