भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग कंपनीने आपला आणखीन एक बजेट फोन बाजारात उतरवला आहे. काल रात्री सॅमसंगने गॅलेक्सी ऑन ८ हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन सध्या फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे.

गॅलेक्सी ऑन ८ हा सॅमसंगचा सिग्नेचर इन्फीनीटी डिस्प्ले असणारा फोन असल्याचे सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (ऑनलाइन विभाग) संदीप सिंह अरोरा यांनी सांगितले. या फोनमध्ये अत्याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर देण्यात आले असून कंपनीने फोनमध्ये दर्जेदार कॅमेरा देण्याकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती अरोरा यांनी दिली.

ऑन ८ मध्ये ६ इंचाचा सुपर अल्मेड इन्फीनीटी डिस्प्ले असून १६ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल असे दोन रेअर कॅमेरा देण्यात आले आहेत. या कॅमेरामध्ये बॅकग्राऊण्ड ब्लर शेप, पोट्रेट डॉली, पोट्रेट बॅकड्रॉप असे खास फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनचा स्क्रीनचे रेशो हा १८:५:९ असल्याचे कंपनीने म्हणणे आहे. फोनचा आकार न वाढवा जास्तीत जास्त डिस्प्ले देण्याच्या उद्देशाने केलेल्या या बदलामुळे आधीच्या फोनपेक्षा या फोनचा डिस्प्ले १५ टक्के मोठा आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली असून ती २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन ग्राहकांना १६ हजार ९९९ रुपयांना विकत घेता येईल.

२०१८ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये जागतिक स्मार्टफोन बाजारातील एकूण टक्केवारीच्या २० टक्के भाग हा सॅमसंगचा आहे. चीनमधील हुवाई, अॅपल या कंपन्यांनाही सॅमसंगने जागतिक स्तरावर मागे टाकले आहे. काऊण्टरपॉइण्ट रिसर्चच्या मार्केट मॉनिटर सेवेने दिलेल्या अहवालानुसार हुवाईचा एकूण मार्केट शेअर १५ टक्के आहे तर अॅपलचा एकूण जागतील मार्केट शेअर ११ टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.

जगभरामध्ये दुसऱ्या तिमाहीत (जानेवारी ते जून या महिन्यांमधील उत्तरार्ध) ३६ कोटी स्मार्टफोन विकले गेल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.