Samsung Launches Vertical Tv SERO : सॅमसंग कंपनीने एक खास टीव्ही सादर केला आहे. पारंपारिक टीव्हीप्रमाणे हा टीव्ही आडवा नाही तर उभा आहे. म्हणजेच डिझाइनच्या बाबतीत हा टीव्ही स्मार्टफोनप्रमाणे आहे. Sero असं सॅमसंगच्या या टीव्हीचं नाव आहे.

मोबाइल प्रेमी तरुणवर्गाचा (मिलेनियल्स) विचार करुन आडवा टीव्ही निर्मीत करण्यावर भर दिल्याचं कंपनीने म्हटलं आहे.  ‘हा टीव्ही अगदी मोबाइलप्रमाणे अनुभव देईल. सध्याचे मिलेनियल्स मोबाइलच्या स्क्रीनवर व्हिडीओ पाहतात, त्यांना मोबाइलची चांगलीच सवय पडली आहे, त्यांना टीव्हीवर देखील मोबाइलप्रमाणे अनुभव मिळावा  हाच विचार करुन आडवा टीव्ही आणण्याचा विचार आला’ असं कंपनीने सांगितलं.

या टीव्हीसोबत स्मार्टफोन कनेक्ट करुन गेम खेळता येईल, किंवा मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ आणि सोशल मीडियाचाही वापर करता येईल. सॅमसंगच्या या टीव्हीला 43 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा टीव्ही उभा असला तरीही तो आडवा देखील करता येतो, अर्थात तुम्हाला आडवा किंवा उभा जसा हवा तसा हा टीव्ही करता येणार आहे. या टीव्हीमध्ये 4.1 चॅनल, 60 वॉटसह हाय-एंड स्पीकर आहेत, याद्वारे तुम्ही सॅमसंग म्युझीक ऐकू शकतात. या टीव्हीला सॅमसंगच्या व्हर्चुअल असिस्टंट Bixby द्वारे कंट्रोल करता येतं. जवळपास 11.30 लाख रुपये (12,500 पौंड) इतकी या टीव्हीची किंमत असून पुढील महिन्यापासून दक्षिण कोरियामध्ये हा टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, इतर देशांमध्ये हा टीव्ही कधीपर्यंत लाँच केला जाणार याबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.

दुसरीकडे, सॅमसंगचा हा टीव्ही उपयुक्त ठरेल की नाही याबाबत सोशल मीडियावर सध्या विविध चर्चा सुरू आहेत.