हृदयरोग हा मृत्यूचा धोका निर्माण करण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचला असल्याचे सहजपणे निदर्शनास आणेल असे सॉफ्टवेअर शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्यामुळे पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार करणे शक्य होणार आहे.

इलेक्ट्रोमॅप म्हणून ओळखले जात असलेले हे सॉफ्टवेअर म्हणजे हृदयासंबंधीचा क्लिष्ट असा तपशील मिळवण्याचे आणि त्याचे विश्लेषण करण्याचे खुले स्रोत (ओपन सोअर्स) सॉफ्टवेअर असल्याची माहिती दुबईच्या बर्मिगहॅम विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिली.

हृदयाची रक्त उपसण्याची (पम्पिंग)क्षमता ही विद्युतीय (इलेक्ट्रिकल) प्रक्रियेने नियंत्रित केली जाते. या क्रियेमुळे हृदयाच्या स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण होते. अऱ्हिथमियासारख्या काही हृदयरोगांमध्ये हृदयाच्या या आकुंचन-प्रसरणाच्या क्षमतेवर परिणाम होतो. यापूर्वी संशोधकांना ऑप्टिकल आणि इलेक्ट्रिकल मॅपिंगद्वारे हृदयाच्या विद्युतीय वर्तनाची नोंद घेणे शक्य होत होते. पण योग्य प्रकारचे सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्यामुळे या तंत्राचा अत्यंत मर्यादित वापर होत होता, अशी माहिती ‘सायंटिफिक रिपोर्ट’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे.

बर्मिगहॅम विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्याते काशीफ राजपूत याबाबत म्हणाले की, इलेक्ट्रोमॅपमुळे हृदयविषयक संशोधनाचा नवा मार्ग मोकळा झाला आहे. यातून अऱ्हिथमियासारखे विकार टाळण्यासाठी मॅपिंग तंत्राच्या वापराला चालना मिळणार आहे. हे निश्चितच सोयीस्कर असे साधन आहे. यात माहितीच्या विश्लेषणासाठी अत्याधुनिक पद्धती वापरण्यात आली आहे. या तंत्रामुळे हृदयरोगांबाबत अत्यंत सखोल माहिती मिळणार आहे. विशेषत: अऱ्हिथमियासारख्या जीवघेण्या विकारांचे स्वरूप समजून घेणे शक्य होणार आहे, असा दावा राजपूत यांनी केला.