स्मार्टफोनच्या बाजारात सध्या जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसते. यामध्ये स्क्रीन, बॅटरी, कॅमेरा आणि इतरही अनेक गोष्टींची खातरजमा करुन ग्राहक फोन खरेदी करतात. आता यामध्ये आणखी एका फोनची भर पडली असून दोन डिस्प्ले आणि दोन रिअर कॅमेरा असलेला फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. Meizu कंपनीच्या या फोनचे नाव Meizu Pro 7 असे आहे.

या Meizu Pro 7 स्मार्टफोनची किंमत २२,९९९ रुपये आहे. हा फोन सध्या केवळ अॅमेझॉन इंडियावर खरेदी करता येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रेअर डुअल LED फ्लॅशसोबत १२ मेगापिक्सलचे २ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. ५.५ इंचाची फुल HD AMOLED स्क्रीन या फोनमध्ये देण्यात आली आहे. तर कॅमेऱ्याच्या खाली १.९ इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. नोटिफिकेशन पाहण्यासाठी हा बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील या अनोख्या फिचर्समुळे जगभरात या फोनची मोठ्या प्रमाणात चर्चा पहायला मिळत आहे. या फोनला MediaTek Helio P25 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ३००० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनला होम बटणामध्ये फिंगरप्रिंट सेंसॉर देण्यात आला आहे.

मात्र यावरही मर्यादित संख्येत फोन उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून पुढील काळात उत्पादन वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या हा फोन काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. फोन वापराच्या आणि उत्पादनाच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या स्पर्धेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.