16 February 2019

News Flash

का होतं फॉरवर्ड आणि व्हायरल?

कोणतीही गोष्ट एखाद्याला व्हायरल व्हावी असं वाटतं म्हणून व्हायरल होत नाही.

मुळात व्हायरल या शब्दाची उत्पत्ती व्हायरसपासून झाली आहे. एखादी गोष्ट जी सतत स्वत:ची प्रतिकृती बनवत वाढत जाते. म्हणजेच एकाकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे करत करत हळूहळू ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचते.

चर्चा
आपल्याकडे आलेला एखादा व्हिडीओ, एखादा जोक किंवा एखादा चांगला मजकूूर असलेला मेसेज पटकन फॉरवर्ड करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. का होतं असं?

कोणतीही गोष्ट एखाद्याला व्हायरल व्हावी असं वाटतं म्हणून व्हायरल होत नाही. ती व्हायरल होण्यामागे विशिष्ट कारण असतं, विशिष्ट परिस्थिती कारणीभूत असते. म्हणूनच एखादी गोष्ट व्हायरल होते म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घेण्यासाठी मुळापासून सुरुवात करावी लागेल. मुळात व्हायरल या शब्दाची उत्पत्ती व्हायरसपासून झाली आहे. एखादी गोष्ट जी सतत स्वत:ची प्रतिकृती बनवत वाढत जाते. म्हणजेच एकाकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे करत करत हळूहळू ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचते. व्हायरल होणारी गोष्ट काहीही असू शकते. एखादा लेख, व्हिडीओ, फोटो, मीम्स या प्रकारांतला कोणताही मजकूर व्हायरल होतो. मजकुराचं माध्यम कोणतं आहे यापेक्षा तो किती लोकांना आकर्षित करतो यावर त्या मजकुराची व्हायरॅलिटी अवलंबून असते.

कोणतीही गोष्ट शेअर करताना दोन प्रमुख गोष्टींचा विचार केला जातो. एक म्हणजे त्या गोष्टीशी ती शेअर करणारी व्यक्ती कुठे ना कुठे स्वत:ला जोडून घेत असते आणि दुसरी म्हणजे आपण ही गोष्ट शेअर केल्यावर आपल्या ओळखीतील व्यक्तींची त्याबद्दलची मते तिला जाणून घ्यायची असतात.  कोणत्याही माध्यमात एखादी गोष्ट शेअर करताना या दोन गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण केवळ याच गोष्टींवर एखाद्या गोष्टीची व्हायरॅलिटी अवलंबून नसते. तर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचे काही गुणधर्म असतात.

पहिला म्हणजे साधेपणा. आकडेमोड, सूत्रे असणारी माहिती क्वचितच व्हायरल होते. त्यापेक्षा उथळ किंवा वरवरची माहिती असणारा लेख, व्हिडीओ किंवा ब्लॉग जो सामान्यांशी पटकन आणि त्यांना समजेल अशा पद्धतीने कनेक्ट होणार असल्यास लोक ती गोष्ट शेअर करण्याची शक्यता अधिक असते. त्याशिवाय मजकूर कोणत्याही माध्यमात असला तरी तो जितका साधा तितका तो व्हायरल होण्याची शक्यता अधिक असं साधं गणित मांडता येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे संदर्भ. त्या गोष्टीशी एखादी व्यक्ती किंवा लोक कशा प्रकारे स्वत:ला जोडतात यावरून त्या गोष्टीचा जीव ठरतो. म्हणजेच ती किती जणांपर्यंत पोहचेल हे ठरते. ज्या गोष्टींबद्दल चारचौघांत चर्चा करता येईल, ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींशी त्याबद्दल बोलता येईल आणि त्या व्हायरल झालेल्या गोष्टीत स्वत:ला कुठे तरी पाहता येईल, असा मजकूर शेअर होण्याची शक्यता अधिक असते. पुस्तक वाचताना ज्याप्रमाणे त्या पुस्तकातील व्यक्तिरेखा आजूबाजूच्या जगात आपण शोधू पाहतो किंवा आपल्या ओळखीतील लोकांना तिथे पाहतो तसंच या व्हायरल मजकुराबद्दलही असतं.

तिसरी गोष्ट जागा आणि उत्सुकता. एखादी गोष्ट कुठे घडलीय किंवा ती कशासंदर्भात आहे याचाही व्हायरॅलिटीवर परिणाम होतो. वर्गात डोळा मारणाऱ्या मुलीचा व्हिडीओ काही तासांमध्ये देशभरात व्हायरल झाला यावरून वर्ग किंवा शालेय जीवनातील प्रेमकथा लोकांना भुरळ पाडतात हे दिसून आले. याशिवाय अपघाताचे, चोरीचे व्हिडीओही व्हायरल होतात. त्यामध्येही रोजच्या वापरातील जागांवर होणाऱ्या गोष्टी लोक स्वत:शी जोडून घेऊन पाहतात.

चौथी गोष्ट म्हणजे रोजच्या जीवनात ज्या गोष्टी सहज शक्य नाहीत, त्या व्हायरल होतात. आता उदाहरण घ्यायचे झाले तर प्रियाचाच व्हिडीओ पाहा. सामान्यपणे शाळेमध्ये जिथे मुलगी उघडपणे मुलाला डोळा मारते, अशा प्रकारच्या प्रेमकथेचा भाग असणे कोणाला आवडणार नाही? समाजामध्ये मुलीने मुलाला डोळा मारणे थोडं प्रवाहविरुद्ध समजलं जातं. त्यामुळेच हा व्हिडीओ अनेकांना आवडला, असंही म्हणता येईल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचे विषय आणि आशय पाहिले तर रोज घडणाऱ्या गोष्टी खूप कमी वेळा व्हायरल होतात. काही विचित्र, मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक, अद्भुत, याआधी कधीही न पाहिलेलं असं काही असेल तर त्या गोष्टी व्हायरल होण्यास जास्त काळ लागत नाही.

एखादी गोष्ट व्हायरल होताना या सर्व गोष्टींचा एकत्रितरीत्या परिणाम साधून येतो आणि ती गोष्ट इंटरनेटसारख्या माध्यमावर काही क्षणामध्ये जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पोहोचते. ‘वैयक्तिक ते  वैश्विक’ अशा आशयाचे एक वाक्य आहे ते अशा व्हायरल मजकुराला लागू होतं. जितके जास्त लोक त्या गोष्टीशी संदर्भ जोडतात तितक्या वेगाने ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं.

व्हायरल तेव्हा आणि आता

इंटरनेट आल्यानंतरच गोष्टी व्हायरल होत आहेत असे नाही. म्हणजे पाकिस्तानी चहावाला किंवा ढिंगच्यॅक पूजा किंवा अगदी कालपरवाची प्रिया यांच्याआधीही अनेक फोटो व्हायरल झाले. देशाच्या सीमा ओलांडून जगभरात पोहोचले. तेव्हाचा काळ वेगळा असल्याने आधी ते फोटो छापून यायचे, त्यानंतर त्यांच्यावर चर्चा होऊन त्यांचा परिणाम दिसायचा किंवा ते पुढे जायचे. मात्र आता उलट झाले आहे. आधी समाजमाध्यमांवर एखादी गोष्ट व्हायरल होते, त्यानंतर तिच्या बातम्या होतात. मात्र माणसाची विचार करण्याची किंवा काही गोष्टींवर व्यक्त होण्याची पद्धत सारखीच असल्याने तेव्हा आणि आता व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये बरेच साधम्र्य आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर बॉम्ब टाकल्यानंतरच्या एका मुलीच्या रस्त्यावरून धावतानाच्या फोटोमधील वेगळेपण, दाहकता, रोजच्या जीवनात न घडणारी घटना असे सगळे व्हायरल होण्याचे गुणधर्म सारखेच होते. १९७२च्या व्हिएतनाम युद्धातील त्या फोटोनंतर अमेरिकेला युद्धबंदीची घोषणा करावी लागली इतका मोठा परिणाम त्या फोटोमुळे झाला. तसेच काहीसे झाले २०१५ साली भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर लाल टीशर्ट घातलेला अ‍ॅलन कुर्दीच्या मृतदेहाचा फोटो पाहिल्यानंतर. हा फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला. जगभरातून सीरिया आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामुळे कशा प्रकारे मुलांचे प्राण जात आहेत याचे दाहक उदाहरण म्हणून अनेक वृत्तपत्रांनी हा व्हायरल झालेला फोटो पहिल्या पानावर छापला. रशियन हवाई दलाने अपोलो शहरावर केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाच वर्षीय ओम्रान दानिशचा फोटोही चांगलाच गाजला होता. समाजमाध्यमे आल्यानंतर पडलेला मुख्य फरक इतकाच की, आधी व्हायरल होणाऱ्या फोटोंचे विषय बऱ्याचशा प्रमाणात गंभीर स्वरूपाचे होते. आता व्हायरल होणारा मजकूर अनेकदा गंभीर प्रकारचा नसतो आणि असला तरी त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे केली जाते. उदाहरण घ्यायचे झाले तर २०१६ मध्ये फुटबॉलचा चाहता असणारा मुर्तुजा अहमदी हा पाच वर्षीय अफगाणी मुलगा प्लॅस्टिकच्या पिशवीची मेस्सीच्या जर्सीसारखी जर्सी बनवून खेळतानाचा फोटो व्हायरल झाला. त्याचा इतका परिणाम झाला की त्यानंतर काही महिन्यांनी खुद्द मेस्सी त्याला भेटला आणि त्याने एक छानशी जर्सी या लहानग्या चाहत्याला भेट दिली.

व्हायरलला असाही हातभार

एखादी गोष्ट व्हायरल होण्यामागे तंत्रज्ञानाचाही हात असतो. ज्या माध्यमातून एखादा मजकूर व्हायरल होत आहे त्याची रचना व्हायरल होण्यासाठी फायद्याची किंवा तोटय़ाची असते, असे युझर इंटरफेस एक्स्पर्ट सौरभ करंदीकर सांगतात. मुळात ज्याला सामान्य नेटकऱ्यांच्या भाषेत व्हायरल म्हणतात त्याला तांत्रिक भाषेत शेअरीबिलिटी असं म्हणतात. त्यामुळे एखाद्या वेबसाइटवर किंवा समाजमाध्यमावर लाइक, शेअरचे पर्याय किती सहजरीत्या उपलब्ध आहेत यावरून तो मजकूर किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे ठरत असल्याचं करंदीकर सांगतात. इंटरनेटवर एखादी गोष्ट पाहताना पहिल्या काही सेकंदांमध्ये त्या गोष्टीने युझर्सचे लक्ष आकर्षित करून घेतल्यास ती गोष्ट शेअर होण्याची शक्यता जास्त असते. सामान्यपणे व्हिडीओचे पहिले पाच ते दहा सेकंद तो व्हिडीओ किती व्हायरल होऊ  शकतो हे सांगतो. अनेक जण लेख, बातम्या किंवा इतर लेखी मजकूर केवळ मथळा वाचून शेअर करतात म्हणूनच अनेक वेबसाइट्स आणि ब्लॉग लाइक, शेअर आणि समाजमाध्यमांचे पर्याय मथळ्याखाली लगेच उपलब्ध करून देतात. त्यातही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारखी जनमानसात रुजलेली माध्यमे एका क्लिकवर माहिती शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात, त्यामुळे मजकूर व्हायरल होण्यास मदतच होते. तसेच अनेकांनी लाइक आणि शेअर केलेय तर आपणही ते करायला हवे, ज्यामुळे आपण मुख्य प्रवाहाच्या बाहेर राहणार नाही असं वाटून व्हायरल गोष्टी शेअर करणाऱ्यांचे प्रमाणही भरपूर असते. त्यामुळे साध्या साध्या गोष्टी व्हायरल व्हायला अशा युझर्सची खूप मदत होते, असे करंदीकर म्हणतात.

व्हायरल कमाई

एखादी व्हायरल गोष्ट केवळ वेळ जात नाही म्हणून अनेक जण शेअर करत असले तरी काही जणांनी याच व्हायरल गोष्टींचा फायदा घेऊन डिजिटल माध्यमांवरून कमाई करण्यास सुरुवात केली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण घ्यायचे झाले तर फेसबुकवरील रजनीकांत व्हर्सेस सीआयडी जोक्सचे संस्थापक शाहिद जावेद आणि अनिकेत मोर यांनी अंदाजे आठ वर्षांपूर्वी रजनीकांत आणि सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्न विनोदांवर आधारित सुरू फेसबुक पेज सुरू केले. आज ते एका डिजिटल वेबसाइटचे मालक झाले आहेत. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब, इन्स्टाग्राम अशा सर्वच समाजमाध्यांवर मिम्स, व्हिडीओ, ब्लॉग, बातम्या अशा अनेक प्रकारचा मजकूर व्हायरल करत करत त्यांनी सोशल मीडिया पार्टनरशिपच्या अंतर्गत अनेक सिनेमांसाठी प्रसिद्धी देण्याचे काम केले आहे. आजच्या घडीला त्यांची आरजीव्हीसी ही देशातील अव्वल ५० वेबसाइट्सपैकी एक आहे. अशाच व्हायरल मजकुराच्या जोरावर लोकप्रिय झालेले आणखी एक नाव म्हणजे ट्रम्प तात्या हे फेसबुक पेज. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना बार्शीवासी करून त्या तरुणांनी आता खासरे डॉट कॉमच्या माध्यमातून मराठी डिजिटल मीडियावर जम बसवला आहे असेच म्हणावे लागेल.
स्वप्नील घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

First Published on March 13, 2018 10:34 am

Web Title: social media forwards and viral