लहानपणी ज्या मुलांना मार दिला की त्यांना शिस्त लावता येते असा अनेक पालकांचा समज असतो. मात्र अशा पालकांसाठी एक वाईट बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणी फटके देऊन वाढवले असेल तर हीच मुले मोठी झाल्यावर तुम्हालाही हिंसकच वागणूक देतील. ‘पेडिअॅट्रीक’ या  नियतकालिकात छापून आलेल्या एका संशोधन अहवालात हे मत नोंदवण्यात आले आहे.

अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठातील वैद्याकिय शाखेतील मानसशास्त्राचे प्राध्यापक जेफ टेम्पल यांनी पालकांकडून मुलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात एक संशोधन केले आहे. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या मुलांला लहानपणी पालकांकडून मार खाण्याची शिक्षा मिळाली ते तरुणपणी डेटींग व्हॉयलेन्स (जोडीदाराबरोबर हिंसक वागणे) करताना दिसून आले. लहान लहान कारणांसाठी पालकांचा मार खाणाऱ्या मुलांमध्ये आपल्या जोडीदाराशी हिंसक वागण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

या अभ्यासामध्ये वय, लिंग, पालकांची शिकवण, पालकांचे शिक्षण, जात आणि बालपाणी मिळालेली वागणूक या सर्व गोष्टींचा मुलांच्या वागण्यावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. ज्या मुलांना लहानपणापासून हिंसेला सामोरे जावे लागते, ज्यांना मारहाण केली जाते ती मुले मोठी झाल्यावर हिंसक बनतात या जुन्या समजुतीला टेम्पल यांच्या संशोधनामुळे पाठबळ मिळाले असल्याचे मत डॉ. बॉब सेजी यांनी व्यक्त केले आहे. बॉब हे अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडिट्रेशियन्सचे प्रवक्ते असून ते मुलांविरुद्ध हिंसा कमी करण्यासंदर्भात काम करतात. मुलांसाठी पालक हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे असतात. आणि त्यांच्याकडून ते समाजात वावरण्याचे तसेच इतर लोकांबरोबर कसे वागावे याबद्दलचे शिक्षण घेतात. फटक्यांची शिक्षा दिल्याने शिकण्याच्या वयात असणाऱ्या मुलांच्या मनात प्रेम आणि हिंसेबद्दल गोंधळ निर्माण होतो असे डॉ. बॉब म्हणाले.

याच अभ्यासाला समर्थन करणारा दुसरा एक अहवाल सायकोलॉजी सायन्स या नियतकालिकात छापून आला आहे. त्यामधील माहितीनुसार मुलांच्या जडणघडणीमध्ये आणि व्यक्तीमत्वावर परिणाम करणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पालक आणि या पालकांनी दिलेली वागणूक. याचबद्दल बोलताना अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठातील संशोधिका एलिझाबेथ ग्रेशॉफ म्हणतात की मुलांना लहानपणी मार देणे हा शिस्त लावण्याचा योग्य मार्ग नाही. उलट मुलांना मारल्याने त्यांची वागणूक आणखीन बिघडते ज्याचे परिणाम मुलं मोठी झाल्यावर दिसून येतात.