जगभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसने भारतामध्ये शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. करोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, हास्तोदंलन करू नका आणि हात स्वच्छ धुवायला सांगितले जात आहेत. करोनाचा धसका लोकांनी चांगलाच घेतला आहे. कार्यालयं आणि घरांमध्ये हँडवॉश आणि सॅनिटायझर ठेवले ठेवले आहेत.

करोना व्हायरसचा प्रदुर्भाव होऊ नये म्हणून लोक काळजी घेत आहेत. काही लोक तर भीतीपोटी सतत हँडवॉश आणि सॅनिटायझरने हात साफ करतात. पण सतत हँडवॉश आणि सॅनिटायझर वापरत असाल तर तुम्ही इतर आजारांना आमंत्रण देत आहात. हँडवॉश किंवा सॅनिटायजर इथाइल अल्कोहोलपासून तयार केले जाते. हे अ‍ॅंटी-सेप्टिकसारखं काम करतं. यात पाणी, फ्रेगरेन्स आणि ग्लिसरीन मिश्रित केलं जातं. तर अल्कोहोल नसलेल्या सॅनिटायजर अँटी-बायोटिक ट्रायक्लोजन किंवा ट्रायक्लोकार्बनपासून तयार केलं जातं. हे साबण आणि टूथपेस्टमध्ये आढळतं. त्यामुळे त्याचा अति वापर केल्यानं त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

हँडवॉश किंवा सॅनिटायजरच्या अतिवापरामुळे तुमचे गुड बॅक्टेरिया नष्ट होऊ लागतात. जे बॅड बॅक्टेरियासोबत लढण्यास मदत करतात. तसेच तुमच्या शरिराचं इम्यून सिस्टीमही बिघडू शकतं. ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.

कधी वापरावं सॅनिटायझर?
सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास किंवा अशा व्यक्तींचं सामान उचलल्यास तसेच गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवं. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत. शिवाय जेवणाच्या आधी आणि जेवणानंतरही तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता.