18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

मूत्रविकाराने त्रस्त आहात? हे आसन करा

योगोपचार उपयुक्त

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ | Updated: October 12, 2017 12:10 PM

हल्लीच्या काळात लोकांना मूत्रविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रोगांवरील उपचारासाठी तज्ज्ञांकडे जाण्याशिवाय पर्यायही नसतो. अशा प्रकारच्या विकारांवर घरगुती कोणते उपाय करावेत हेही आपल्याला माहिती नसते. मात्र, योगामध्ये अशा समस्यांवरही उपाय आहेत. अशाप्रकारचा त्रास होत असल्यास स्थित ऊर्ध्वपादविस्तृतासन करावे.

हे बैठकस्थितीतील आसन आहे. प्रथम जमिनीवर बसावे. नंतर दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घेऊन पाय पसरावेत. श्वास घेत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडावेत. मग दोन्ही पाय साधारण एक ते दीड फुट जमिनीपासून वर घ्यावेत एकदम घेता येणार नाहीत तोल जाण्याची शक्यता असते म्हणून एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. सुरूवातीला दोन्ही पाय अर्धा फूटच वर जातील. आपण पडत तर नाही ना अशी भीती वाटते, पण घाबरून न जाता हे आसन करावे. सरावाने हे आसन चांगल्याप्रकारे जमू शकते. श्वास घेत पाय उचलावेत आणि मग कुंभक म्हणजेच श्वास रोखून धरावा. हे आसन करताना आपले पाय आणि हात दोन्ही सरळ रहायला हवेत. शरीराचा पार्श्वभाग जमिनीला टेकलेला असावा. पाय आणि हात मात्र हवेत पसरवलेले आणि घट्ट पकडलेल्या स्थितीत असावेत. स्थिरता आल्यानंतर सराव नसल्यामुळे दमल्यासारखे वाटल्यास श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीवर घ्यावेत. हे तोलात्मक आसन आहे. दोन्ही पाय उचलून ताठ फाकवलेल्या अवस्थेत ठेवणे अवघड जाते, पण सरावाने स्थितऊर्ध्वपादविस्तृत स्थिती घेता येते.

या आसनाचे फायदे अनेक आहेत. यामुळे हातापायांची शक्ती वाढते. हाता-पायांना, गुडघे, पोटऱ्या, मांडय़ा, जांघ, घोटे तसेच गुप्तांगालासुद्धा व्यायाम मिळतो. ज्यांना अचानक खोकला किंवा शिंक आल्यावर मुत्रवृद्धीचा विकार जडतो त्यांनी हे आसन जरूर करावे. नित्य सरावाने शक्ती वाढून शरीर बलवान होते. यामुळे काम करण्याचा उत्साह वाढतो. पचनक्रिया सुधारते कारण पाठ, नाभी आणि पोटाला ताण बसल्याने तेथील ग्रंथींचे कार्य सुधारते. हे आसन नियमित केल्याने मज्जारज्जूला व्यायाम मिळतो. चांगल्या संततीसाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. तसेच वंध्यत्व नाश करणारे हे आसन आहे. ज्यांच्या पोटाची, गुडघ्याची, पाठीच्या शस्त्रक्रिया झाल्या असतील अशांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. यामध्ये श्वसनाची पथ्ये पाळणेही अतिशय गरजेचे आहे.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ

First Published on October 12, 2017 12:00 pm

Web Title: useful yogasan for urine problems and family planning problems